वसईतील प्रस्तावित रेल्वे स्थानकाला ‘न्यू खारबांव’ नाव देण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिकांची भूमिका ठाम; रेल्वेमंत्र्यांकडे नाव बदलण्याची मागणी.
वसई पूर्वेकडील नागले येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या रेल्वे स्थानकाला ‘न्यू खारबांव’ असे नाव देण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हे नामकरण तात्काळ रद्द करून स्थानकाला ‘नागले’ किंवा ‘न्यू कामण’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात वसई-विरार महापालिकेच्या माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांनी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नागले हे वसई तालुक्यातील शेवटच्या टोकावरील महत्त्वाचे गाव असून, येथे नवीन रेल्वे स्थानक उभारताना स्थानिक ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेला विश्वासात घेण्यात आले नाही. तसेच या नामकरणाबाबत ग्रामसभेचा कोणताही ठराव घेण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, खारबांव हे गाव ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असून तेथे आधीपासूनच रेल्वे स्थानक कार्यरत आहे. दुसरीकडे, नागले येथील प्रस्तावित स्थानकापासून वसई तालुक्यातील कामण रोड रेल्वे स्थानक अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत वसईतील नव्या स्थानकाला भिवंडीतील गावाचे नाव देणे भौगोलिक आणि प्रशासकीयदृष्ट्या चुकीचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, ‘न्यू खारबांव’ या नामकरणामुळे वसई परिसरातील नागरिकांच्या अस्मितेचा आणि स्थानिक ओळखीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या नावामुळे भविष्यात प्रवाशांमध्येही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा विषय मांडून स्थानिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात, तसेच प्रस्तावित ‘न्यू खारबांव’ हे नाव रद्द करून ‘नागले’ किंवा ‘न्यू कामण’ या नावांपैकी योग्य नाव मंजूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे तातडीने शिफारस करावी, अशी मागणी माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी केली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
