धारावी पुनर्विकास प्रकल्प, वृक्षतोड, पुनर्रोपण, पर्यावरण संरक्षण आणि ३० हजारांहून अधिक नवीन वृक्षलागवडीबाबतची सविस्तर माहिती वाचा.
धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे सुमारे आठ हजार झाडे बाधित होण्याची शक्यता असून, त्याच्या भरपाईसाठी ३० हजारांहून अधिक नवीन झाडे लावण्याची योजना आखण्यात आली आहे. या झाडांची सात वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडकडे सोपविण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून, तो मंजुरीसाठी वृक्ष प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एकूण १,६९३ झाडे बाधित होणार असून, त्यापैकी ८७१ झाडे तोडण्यात येणार आहेत, तर ८२२ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येईल. या बदल्यात पालघर जिल्ह्यातील चहाडे गावातील ९० एकर जागेवर २२,९०४ स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याचे हमीपत्र विकासक कंपनीने महापालिकेला दिले आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाच्या प्रस्तावानुसार, धारावीतील शहर सर्वेक्षण क्रमांक २ (भाग) आणि ३ (भाग), सब प्लॉट-बी येथे पुनर्वसन इमारतींच्या बांधकामासाठी होणाऱ्या उत्खननामुळे ही झाडे प्रभावित होणार आहेत. मे २०२६ मध्ये करण्यात आलेल्या पाहणीत या परिसरात १,९९८ सुदृढ आणि सात उन्मळून पडलेली अशी एकूण २,००५ झाडांची नोंद करण्यात आली होती. मंजूर आराखड्यानुसार त्यापैकी १,६९३ झाडे प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरत असल्याने त्यांना हटविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतरच झाडे तोडण्याची किंवा पुनर्रोपणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
१५ दिवसांत वृक्षलागवड
विकासक कंपनीने दिलेल्या हमीपत्रानुसार, झाडे तोडल्यानंतर १५ दिवसांच्या आत २२,९०४ नवीन झाडांची लागवड करण्यात येईल. ही सर्व झाडे किमान सहा फूट उंचीची आणि स्थानिक प्रजातींची असतील. तसेच त्यांची सात वर्षे नियमित देखभाल करण्याची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली आहे.
विकासकाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपूर्ण धारावी पुनर्विकास प्रकल्पादरम्यान सुमारे आठ हजार झाडे बाधित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्याच्या भरपाईसाठी ३० हजारांहून अधिक झाडांची लागवड केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अन्य प्रकल्पांमुळेही १,४४३ झाडे बाधित
मुंबई महानगरपालिकेच्या विविध पायाभूत सुविधा आणि बांधकाम प्रकल्पांमुळे आणखी १,४४३ झाडे बाधित होणार आहेत. त्यापैकी ९०२ झाडे तोडण्यात येणार असून, ५४१ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येईल. या बदल्यात २१,६२५ नवीन झाडांची लागवड केली जाणार आहे.
या प्रकल्पांमध्ये ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह भूमिगत बोगदा, अंधेरी विमानतळ परिसरातील बांधकाम, कांदिवली चारकोप येथील अदानी इलेक्ट्रिक सबस्टेशन, मलबार हिल पुनर्विकास, आयआयटी पवई, बीएआरसी जोडरस्ता, हिरानंदानी परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन, घाटकोपर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), पोईसर गाव तसेच बोरीवलीतील विविध पुनर्विकास प्रकल्पांचा समावेश आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
