महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉक्टरांना वेब पत्ता काळजीपूर्वक तपासून केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. बनावट संकेतस्थळाबाबत पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) नावाने बनावट संकेतस्थळ तयार करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली असून, त्यामुळे डॉक्टरांची दिशाभूल होण्याबरोबरच आर्थिक फसवणुकीचाही धोका निर्माण झाला आहे. हे बनावट संकेतस्थळ गेल्या एक ते दोन महिन्यांपासून कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
एमएमसीचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtramedicalcouncil.org.in/ आहे. मात्र, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी https://www.maharashtramedicalcouncile.in/ या पत्त्याने बनावट संकेतस्थळ तयार केले असून, त्यात Council या शब्दाऐवजी Councile असे स्पेलिंग वापरले आहे. हा अत्यंत किरकोळ फरक असल्यामुळे प्रथमदर्शनी हे संकेतस्थळ अधिकृत असल्याचा भास निर्माण होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
या बनावट संकेतस्थळावर ‘MMC Members’ या पर्यायावर क्लिक केल्यास प्रशासक म्हणून डॉ. विंकी रुघवानी यांचा फोटो दिसतो. तसेच ‘RMP Login’ हा पर्याय सक्रिय असून, त्यामध्ये डॉक्टरांकडून वापरकर्तानाव आणि संकेतशब्द मागविले जातात. सायबर गुन्हेगारांचा उद्देश ही संवेदनशील माहिती मिळविण्याचा असू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय या संकेतस्थळावर ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ‘KYC’ या पर्यायावर क्लिक केल्यास वापरकर्त्याला अधिकृत केवायडी संकेतस्थळावर पुनर्निर्देशित केले जाते. त्यामुळे हे संकेतस्थळ अधिकृत असल्याचा आभास अधिक दृढ होतो.
हे बनावट संकेतस्थळ गेल्या एक-दोन महिन्यांपासून सुरू असल्याने सायबर गुन्हे शाखेने तातडीने तपास करून ते बंद करावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, एमएमसीने आपल्या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर यासंदर्भातील इशारा प्रसिद्ध केला आहे. डॉक्टरांनी कोणत्याही संकेतस्थळावर लॉगिन करण्यापूर्वी वेब पत्ता काळजीपूर्वक तपासावा, केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा तसेच वैयक्तिक माहिती किंवा ऑनलाइन शुल्क भरताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
एमएमसीचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले की, “बनावट संकेतस्थळाची माहिती मिळताच त्याच दिवशी अधिकृत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आणि पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली. सध्या या बनावट संकेतस्थळावर केवळ एकच पृष्ठ उघडते आणि त्यापुढे कोणतीही प्रक्रिया होत नाही. त्यामुळे तत्काळ नुकसान होण्याचा धोका कमी असला, तरी डॉक्टरांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.”

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
