दोन महिने पोषण आहार बंद; रिकाम्या ताटल्या घेऊन विद्यार्थ्यांचा शहापूर पंचायत समितीवर मोर्चा

दोन महिने पोषण आहार न मिळाल्याच्या निषेधार्थ शहापूर पंचायत समितीवर विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी रिकाम्या ताटल्या घेऊन मोर्चा काढत शासनाकडे तातडीने पुरवठा सुरू करण्याची मागणी केली.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा रखडल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन; ४८ तासांत पुरवठा सुरू करण्याची मागणी.

 शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटूनही ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ मिळालेला नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी शहापूर येथे विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि ग्रामस्थांनी रिकाम्या ताटल्या हातात घेऊन पंचायत समिती कार्यालयावर ‘ताटली मोर्चा’ काढला. या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर आणत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शासकीय आणि जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार दिला जातो. त्यासाठी धान्य, किराणा साहित्य आणि स्वयंपाक खर्च वेळेत उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील जून आणि जुलै हे दोन महिने उलटूनही ठाणे व पालघर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पोषण आहार सुरू झालेला नसल्याचे समोर आले आहे.

तांदूळ, कडधान्य, खाद्यतेल यांसारख्या आवश्यक साहित्याचा पुरवठा रखडला असून जून-जुलै महिन्याचा स्वयंपाक खर्चही शाळांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या पोषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. रिकाम्या ताटल्या हातात घेऊन ‘विद्यार्थ्यांच्या ताटात अन्न द्या’ आणि ‘पोषण आहार तात्काळ सुरू करा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला.

आंदोलकांनी पुढील २४ ते ४८ तासांत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रलंबित धान्य व खाद्यसाहित्याचा पुरवठा करावा, जून-जुलै महिन्याचा स्वयंपाक खर्च तातडीने जमा करावा आणि पुरवठ्यातील दिरंगाईस जबाबदार अधिकारी, पुरवठादार व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच पुरवठा नियमित होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करून विद्यार्थ्यांचा पोषण आहार खंडित होणार नाही, याची खात्री करण्याचीही मागणी करण्यात आली.

याशिवाय सर्व शाळांमध्ये पोषण आहार सुरू झाल्याचा अधिकृत अहवाल जाहीर करावा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी नियंत्रण यंत्रणा उभारावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्काचा प्रश्न अधोरेखित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या ताटातील अन्न सलग दोन महिने गायब राहिल्याने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ तातडीने थांबवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!