नागपूर ग्रामीण भागातील पांजरी (लोढी) गावात सायबर सुरक्षेचा संदेश; कुणाल मेश्राम व ऋतुजा गिरी यांनी ग्रामस्थांना ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन केले.
सायबर गुन्ह्यांविरोधातील जनजागृती आता शहरांपुरती मर्यादित न राहता थेट ग्रामीण भागाच्या मुळापर्यंत पोहोचली आहे. Quick Heal Foundation यांच्या पुढाकाराने आणि Government Institute of Forensic Science, Nagpur यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ या उपक्रमाने आता ग्रासरूट स्तरावर प्रवेश केला आहे. 
या उपक्रमांतर्गत Team G5 मधील कुणाल मेश्राम आणि ऋतुजा गिरी यांनी नागपूरच्या ग्रामीण भागातील पांजरी (लोढी) गावात विशेष सायबर जनजागृती अभियान राबविले. या अभियानाचा उद्देश ग्रामीण नागरिकांना वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांची माहिती देणे आणि डिजिटल व्यवहार करताना आवश्यक असलेल्या सुरक्षिततेच्या उपायांची जाणीव करून देणे हा होता.
अभियानादरम्यान ग्रामस्थांना ऑनलाइन आर्थिक फसवणूक, फिशिंग, OTP/UPI संबंधित फसवणूक, बनावट कॉल व संदेश, सोशल मीडिया फ्रॉड, बनावट लिंक, डिजिटल अरेस्टच्या नावाने होणारी फसवणूक, बनावट KYC/बँक अपडेट संदेश तसेच इतर सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबत माहिती देण्यात आली. 
तसेच, संशयास्पद कॉल, मेसेज किंवा ऑनलाइन व्यवहाराच्या वेळी कोणती काळजी घ्यावी, वैयक्तिक व बँकिंग माहिती कोणासोबत शेअर करू नये आणि फसवणूक झाल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. नागरिकांना सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये 1930 हेल्पलाइन आणि cybercrime.gov.in या माध्यमातून तक्रार करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
गावातील सायबर जागरूकतेचा सर्वेक्षणातून आढावा
जनजागृती अभियानासोबतच Team G5 ने पांजरी (लोढी) गावात सायबर जागरूकता सर्वेक्षण देखील केले. विविध वयोगटातील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या डिजिटल वापराबाबतची माहिती, सायबर फसवणुकीविषयीची जाणीव, ऑनलाइन सुरक्षिततेच्या सवयी आणि फसवणुकीच्या प्रसंगी कोणती पावले उचलावी याबाबतचा आढावा घेण्यात आला.
या सर्वेक्षणामुळे ग्रामीण भागातील सायबर जागरूकतेची सद्यस्थिती समजून घेण्यास तसेच भविष्यातील जनजागृती उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे.
“शहरापासून गावापर्यंत, प्रत्येक नागरिक डिजिटलदृष्ट्या सुरक्षित असावा” या उद्देशाने Team G5 ने राबविलेल्या या उपक्रमातून ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ मोहिमेने आपली वाटचाल खऱ्या अर्थाने ग्रासरूट स्तरापर्यंत पोहोचवली आहे.
MISSION CYBER KAVACH
“माझं गाव, सायबर सुरक्षित गाव!”
पांजरी (लोढी) गावातील या अभियानातून गावकऱ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, गावाला सायबर-सुरक्षित गावाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे नेण्यात आले आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
