एनसीइआरटी अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे जातीय, लैंगिक दडपशाहीचे समर्थन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकार , राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका

एनसीईआरटीच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या प्रस्तावावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र आक्षेप घेत हा निर्णय संविधानातील समता, सामाजिक न्याय आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्यांच्या विरोधात असल्याचा दावा केला आहे.

मनुस्मृतीच्या प्रस्तावित समावेशावरून राजकीय व सामाजिक चर्चा रंगली असून, प्रकाश आंबेडकर यांनी समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याची भूमिका मांडली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी NCERT च्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या प्रस्तावावर तीव्र आक्षेप घेत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करणे हे गंभीर घटनात्मक आणि सामाजिक प्रश्न निर्माण करणारे आहे. डॉ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीला मूलभूत स्वरूपात नाकारले होते, कारण या ग्रंथात जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि महिलांच्या दुय्यम स्थानाला धार्मिक मान्यता दिल्याचा आरोप त्यांनी केला.

आंबेडकर यांनी पुढे म्हटले की, मनुस्मृती हा केवळ नियमांचा संग्रह नसून श्रेणीबद्ध विषमता, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाला वैधता देणारी सामाजिक रचना आहे. भारतीय संविधान हे या विचारसरणीच्या पूर्णपणे विरोधात असून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर आधारित आहे, असेही त्यांनी नमूद केले.

त्यांच्या मते, संविधानाने जन्माधारित विशेषाधिकार संपवून सर्व नागरिकांना समान अधिकार दिले असून सामाजिक न्यायाची मजबूत चौकट निर्माण केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी असा दावा केला की, समाजात मनुस्मृतीने रुजवलेली विषमता आणि अस्पृश्यतेची परंपरा अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था ही समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक मुक्ती यांना चालना देणारी असावी.

मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश झाल्यास जातीय आणि लैंगिक दडपशाहीचे सामान्यीकरण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. हा निर्णय बाबासाहेबांच्या विचारांना विरोधात असून सावरकर व गोळवलकर यांच्या विचारसरणीला बळ देणारा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!