वसई, विरार, अर्नाळा, तुंगारेश्वर, चिंचोटीसह अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी. सुरक्षिततेसाठी प्रशासनाचे महत्त्वाचे आदेश.
वसई–विरार परिसरातील धबधबे, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने १५ जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंदी घातली आहे. मान्सून सुरू होताच मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात, मात्र स्टंटबाजी, मद्यपान करून पाण्यात उतरणे आणि पाण्याचा अंदाज न घेता पोहणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अशोक वीरकर आणि परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) (२) अंतर्गत मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या बंदीअंतर्गत वसईतील सुरुची, रानगाव, भुईगाव, बेनापट्टी, ब्राह्मण पाडा यांसह देवकुंडी (कामण), चिंचोटी धबधबा आणि राजावळी खदाण या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच विरारमधील फुलपाडा डॅम, कुंभारपाडा तलाव, तुंगारेश्वर धबधबा, जेट्टी परिसर, तानसा नदी, पेल्हार धरण आणि अर्नाळा, कळंब, नवापूर, राजोडी येथील समुद्रकिनाऱ्यांवरही पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटकांनो हे नियम लक्षात घ्या ?
कोणत्याही पर्यटन स्थळावर पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असेल. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात, खोल पाण्यात उतरण्यास आणि धबधब्यांच्या प्रवाहाखाली बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे आणि धोकादायक वळणांवर सेल्फी काढणे किंवा कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे. निसर्गनिर्मित धबधब्यांच्या परिसरात मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, त्याची वाहतूक करणे, अनधिकृत विक्री करणे आणि उघड्यावर मद्य पिणे यावर पूर्णपणे बंदी असेल. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे किंवा ध्वनिक्षेपक लावून ध्वनी प्रदूषण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
