एलटीटी स्थानकावर ५६ तासांचा मेगाब्लॉक ; ठाणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम, अनेक गाड्यांचे मार्ग व वेळापत्रक बदलले

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २४ ते २६ जूनदरम्यान सुरू असलेल्या ५६ तासांच्या विशेष मेगाब्लॉकमुळे ठाणे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग व वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

ठाणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! एलटीटीवरील ५६ तासांच्या मेगाब्लॉकमुळे अनेक एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे विविध पायाभूत सुविधांच्या कामांसाठी मध्य रेल्वेने ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक २४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २६ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत ठाणे रेल्वे स्थानकातील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या मेगाब्लॉकदरम्यान एलटीटी स्थानकात शंटिंग नेकचे बांधकाम, सिक साइडिंगमध्ये बदल, देखभाल साइडिंग यार्डची कामे तसेच पिट लाईन विस्तारासह पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याशी संबंधित कामे करण्यात येणार आहेत.

या कामांमुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांवर परिणाम होणार असून काही गाड्या ठाणे रेल्वे स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. २३ जून रोजी प्रवास सुरू करणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेस, चेन्नई–एलटीटी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस आणि गोरखपूर–एलटीटी एक्सप्रेस यांसारख्या गाड्या ठाणे स्थानकावर थांबविण्यात येतील.

तसेच २४ जून रोजी एलटीटीहून रात्री सुटणारी पाटलिपुत्र एक्सप्रेस २५ जून रोजी पहाटे ३.३० वाजता सोडण्यात येणार आहे. २५ जून रोजी कुशीनगर एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, बल्हारशाह–एलटीटी एक्सप्रेस आणि अमृत भारत एक्सप्रेस यांसारख्या गाड्याही ठाणे स्थानकावरच थांबणार आहेत.

याशिवाय एलटीटीहून सुटणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामध्ये करमळी वातानुकूलित एक्सप्रेस, बनारस एक्सप्रेस आणि पाटलिपुत्र एक्सप्रेस यांचा समावेश आहे.

२६ जून रोजीही काही गाड्या ठाणे स्थानकावर थांबवण्यात येणार असून कुशीनगर एक्सप्रेस, गया–एलटीटी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस आणि भुवनेश्वर–एलटीटी एक्सप्रेस यांचा त्यात समावेश आहे.

या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना गैरसोय होण्याची शक्यता असून मध्य रेल्वेने प्रवाशांनी आधीच नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!