भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

एमएमआरडीएने उभारलेला मिरा-भाईंदरमधील चर्चेचा विषय ठरलेला उड्डाणपूल आवश्यक सुधारणा आणि सुशोभीकरणानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पुलाच्या सुरूवातीमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

चार मार्गिकांवरून दोन मार्गिकांमध्ये उतरणाऱ्या रचनेमुळे वादग्रस्त ठरलेला भाईंदर उड्डाणपूल अखेर नागरिकांसाठी खुला झाला. उद्घाटनानंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले.

आगळ्या-वेगळ्या रचनेमुळे जगभर चर्चेत आलेला एमएमआरडीएचा मिरा-भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपूल अखेर रविवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलाच्या सुरूवातीमुळे परिसरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.

मिरा-भाईंदर शहरातील प्रमुख मार्गांवर मेट्रो प्रकल्पासोबतच एमएमआरडीएकडून तीन उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. त्यापैकी दोन पूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असून एका पुलाचे काम अद्याप प्रलंबित आहे. दीपक हॉस्पिटलजवळ सुरू होणारा हा पूल भाईंदर फाटक परिसरात उतरतो.

मात्र, या पुलाच्या रचनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. चार मार्गिकांचा असलेला हा पूल भाईंदर येथे उतरतानाच दोन मार्गिकांचा होत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे एमएमआरडीएच्या नियोजनावर नागरिक व विविध संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर पूल सुरू करण्यापूर्वी काही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या तसेच सुशोभीकरणाची कामेही पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रविवारी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत हा पूल अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

उद्घाटनानंतर परिसरातील वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले असून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर काही प्रमाणात पडदा पडल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!