एसटी महामंडळाची मासिक आर्थिक तूट वाढत असून जूनमध्ये ती सुमारे १७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. वेतन आणि प्रलंबित मागण्यांबाबत विधानभवनात श्रमिक संघटनांची महत्त्वाची बैठक होणार आहे.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळ गंभीर आर्थिक संकटातून जात असून राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळाली नाही, तर पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांचे वेतन देणे महामंडळासाठी कठीण होणार असल्याचा गंभीर इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने दिला आहे. इंधन, दुरुस्ती, देखभाल आणि दैनंदिन खर्चासाठीही निधी उपलब्ध नसल्याने एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महामंडळाने आतापर्यंत विविध मार्गांनी आर्थिक जुळवाजुळव करून केवळ नक्त वेतन देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता सर्व पर्याय संपुष्टात आल्याने आर्थिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. डिझेल पुरवठादार, सुटे भाग, पथकर, दुरुस्ती व देखभाल तसेच भाडेतत्त्वावरील बसचे देयके मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत.
त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी (पीएफ), ग्रॅज्युइटी, रजा रोखीकरण, वैद्यकीय व प्रवास भत्ते तसेच बँक कर्जाच्या हप्त्यांची रक्कमही संबंधित संस्थांकडे जमा करण्यात आलेली नाही. डिसेंबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत कर्मचाऱ्यांची तब्बल ६३३ कोटी २ लाख रुपयांची देणी थकीत असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची मासिक आर्थिक तूटही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिसेंबरमध्ये ६२ कोटी रुपये, जानेवारीत १३३.८९ कोटी, फेब्रुवारीत ३३ कोटी, मार्चमध्ये ३३ कोटी, एप्रिलमध्ये ८४.७९ कोटी, मेमध्ये ११६ कोटी तर जूनमध्ये सुमारे १७० कोटी रुपयांची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्याचे मोठे आव्हान व्यवस्थापनासमोर उभे राहिले आहे.
दरम्यान, विधानभवनात सोमवारी सर्व श्रमिक संघटनांची बैठक होणार असून त्यामध्ये वेतनासाठी निधी उपलब्ध करणे, प्रलंबित आर्थिक मागण्या, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच अन्य देणी यावर चर्चा होणार आहे.
एसटी कर्मचारी काँग्रेसने राज्य सरकारला तातडीने एकरकमी आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा एसटीचे नियमित संचालन करणे कठीण होईल आणि त्याचा थेट परिणाम लाखो प्रवासी व हजारो कर्मचाऱ्यांवर होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
