गिरीश महाजन प्रकरणात सायबर तपास केंद्रस्थानी. राजकीय खच्चीकरणाचा डाव की सोशल मीडियावरील अपप्रचार? संपूर्ण विश्लेषण वाचा.
भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांची एका तरुणीबरोबरची काही आक्षेपार्ह छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव सायबर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला तरी यामागे नेमके कोणते राजकीय किंवा इतर हितसंबंध कार्यरत असू शकतात, याबाबत विविध स्तरांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे ही घटना अशा काळात समोर आली आहे, जेव्हा राज्यातील राजकीय वातावरण आधीच विविध मुद्द्यांमुळे तापलेले आहे.
एकनाथ खडसे पर्वाचा अति महत्वाकांक्षेतून अस्त झाल्यानंतर गिरीश महाजन हे भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. जळगावसह नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या शब्दाला अलिकडे मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षांतर्गत रणनीती असो किंवा विरोधकांविरोधातील राजकीय व्यवस्थापन, महाजन यांना भाजप नेतृत्वाकडून विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला असल्यास त्यामागे केवळ वैयक्तिक नव्हे तर व्यापक राजकीय उद्देश असण्याची शक्यता विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही महाजनांच्या या प्रकरणाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. कुंभमेळ्यासाठी मंजूर हजारो कोटी रुपयांचा निधी, पायाभूत सुविधा, विविध विकासकामे आणि त्यांचे राजकीय श्रेय यावरून सत्ताधारींमध्येच संघर्ष वाढत आहे. त्यामुळे काही राजकीय निरीक्षक या घटनेकडे कुंभमेळ्याशी संबंधित राजकीय स्पर्धेच्या दृष्टिकोनातूनही पाहत आहेत. मात्र, या दाव्यांना पुष्टी देणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप उपलब्ध नाही.
सायबर तपासाकडे सर्वांचे लक्ष
राजकीय क्षेत्रात प्रतिमा हीच सर्वात मोठी ताकद मानली जाते. त्यामुळे एखाद्या लोकप्रिय किंवा प्रभावशाली नेत्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार करणे, बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट छायाचित्रे तयार करणे हे प्रकार अलीकडच्या काळात वाढल्याचे दिसून येत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही निवडणुकांच्या काळात एआय-निर्मित व्हिडीओ, डीपफेक आणि मॉर्फ केलेल्या छायाचित्रांचा वापर करून दिशाभूल करण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
गिरीश महाजन प्रकरणात पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधित छायाचित्रे एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आली असावीत किंवा त्यामध्ये छेडछाड करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तपासाचा केंद्रबिंदू आता या छायाचित्रांचा मूळ स्रोत, त्यांची निर्मिती करणारी व्यक्ती किंवा गट आणि त्यांचा प्रसार करणारे सोशल मीडिया नेटवर्क यांच्यावर राहणार आहे.
राजकीय खच्चीकरणाचे डावपेच?
सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या डिजिटल मोहिमांमध्ये अनेकदा बनावट खाती आणि समन्वित सोशल मीडिया नेटवर्कचा वापर केला जातो. त्यामुळे तपासासाठी तांत्रिक कौशल्यासोबतच वेळ लागण्याची शक्यता आहे. या घटनेकडे केवळ एका व्हायरल पोस्टच्या स्वरूपात न पाहता व्यापक सायबर आणि राजकीय युद्धाच्या संदर्भात पाहण्याची गरज आहे. सोशल मीडिया हे आज जनमत घडविण्याचे प्रभावी माध्यम बनले असून काही मिनिटांत लाखो लोकांपर्यंत कोणतीही माहिती पोहोचू शकते. त्यामुळे सत्य-असत्याची पडताळणी होण्यापूर्वीच एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर प्रभावित होण्याची शक्यता असते.
दरम्यान, विरोधी पक्षातील काही नेत्यांनी या छायाचित्रांवरून सरकार आणि मंत्री महाजन यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्याचवेळी मंत्री महाजन यांनी हे नियोजित षड्यंत्र असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागल्याचे चित्र दिसत आहे. भाजपमधील वाढते महत्त्व आणि हस्तक्षेप लक्षात घेता गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंप्रमाणे राजकीय खच्चीकरण करण्याचे हे डावपेच असू शकतात, असेही बोलले जात आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
