जळगावात भीषण अपघातात तरुणाचा बळी; वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे मानराज पार्क चौफुलीवर उपाययोजनांची मागणी तीव्र.
शहरातील मानराज पार्क चौफुली येथे झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने हा अपघात झाला.
मृत तरुणाचे नाव ओम सुनील गिरी (वय २५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम दुचाकीवरून जात असताना अचानक वेगात येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ओमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताने परिसरातील नागरिक हादरले असून, रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अपघाताची माहिती मिळताच ओमच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या आई व बहिणीचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले. या हृदयद्रावक प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.
दरम्यान, अपघातानंतर काही काळासाठी दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आला.
या घटनेमुळे मानराज पार्क चौफुली हे अपघातप्रवण ठिकाण असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने येथे स्पीड ब्रेकर व सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अमर जैन, सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील, राहुल पाटील तसेच उपमहापौर मनोज चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
