मशीनमध्ये स्कार्फ अडकून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; जळगावच्या एमआयडीसीतील घटना : Accident in Jalgaon MIDC

 

जळगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत असताना मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने गंभीर जखमी झालेल्या ४५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जमुना रामकरण पाटील (रा. जामोद, जि. खंडवा, मध्य प्रदेश) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जमुना पाटील आणि त्यांचे पती रामकरण पाटील हे एमआयडीसीमधील ‘डी-६’ सेक्टरमधील आर.सी. फूड या कंपनीत कामाला होते. १७ मार्च रोजी नेहमीप्रमाणे काम करत असताना जमुना यांच्या गळ्यातील स्कार्फ अचानक मशीनमध्ये अडकला. स्कार्फसह त्यांचे केसही मशीनमध्ये ओढले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

अपघातानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने २० मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मध्य प्रदेशातील मूळ गावी नेण्यात आला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *