खडके फाट्यावर मृत्यूशी झुंज; भरधाव बसची दुचाकीला भीषण धडक, एकाच कुटुंबातील चौघे जखमी.

एरंडोल-कासोदा मार्गावरील खडके फाट्याजवळ भडगाव-धरणगाव बसने दुचाकीला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

एरंडोल परिसरात पुन्हा अपघाताची घटना; बस आणि दुचाकीच्या धडकेत महिला व दोन लहान मुलांसह चौघे जखमी, नागरिकांकडून मदतकार्य.

एरंडोल-कासोदा मार्गावरील खडके फाट्याजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला असून भडगाव-धरणगाव बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ एमएच ६९९७ क्रमांकाची भडगाव-धरणगाव बस कासोदा येथून एरंडोलकडे येत असताना खडके फाट्याजवळ एमएच १९ ईटी ४३३९ क्रमांकाच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. या अपघातात दुचाकीस्वार, त्यांची पत्नी व दोन लहान मुले जखमी झाली असून जखमी पावरा कुटुंब हे आडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून खाजगी वाहनाने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, एरंडोल-कासोदा मार्गावरील वाढते अपघात पाहता वाहतूक सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीहोत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!