जळगावात उष्माघाताचा पहिला बळी; ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

४४ अंश तापमानाच्या पार्श्वभूमीवर तुकारामवाडी येथे ६० वर्षीय वृद्धाचा संशयित उष्माघाताने मृत्यू; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

जळगावात उष्माघाताची पहिली घटना समोर; तुकारामवाडी परिसरात ६० वर्षीय व्यक्तीचा संशयित मृत्यू.

 शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे. जळगाव येथील तुकारामवाडी परिसरात ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृत व्यक्तीचे नाव लोधू नामदेव पाटील (वय ६०, रा. हिंगणे ता. बोदवड, ह.मु. तुकारामवाडी, नेरीनाका, जळगाव) असे आहे. ते एमआयडीसी जळगाव परिसरातील दालमिल कंपनीत कामाला होते. पत्नीसमवेत ते तुकारामवाडीत वास्तव्यास होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ते दोघे शनिवारी मूळगावी गेले होते. रविवारी सायंकाळी लग्न समारंभ आटोपल्यानंतर ते बसने जळगावात परतले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला.

दरम्यान, सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास नेरीनाका परिसरातील एसटी वर्कशॉपजवळील भिंतीलगत त्यांचा मृतदेह आढळून आला. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेची माहिती काही कामगारांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला. दरम्यान, रविवारी जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. लोधू पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!