जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात आग; स्टोअर रूममधील साहित्याचे नुकसान, तपास सुरू.
जळगाव शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील जुन्या पोलिस मुख्यालयातील रेकॉर्ड रूमला सोमवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. कॅन्टीनजवळील स्टोअर रूममध्ये अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळी सुमारे ११ वाजता स्टोअर रूममधून अचानक धूर निघताना दिसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी तत्काळ याची माहिती दिली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि समन्वयाने कारवाई करत आग इतरत्र पसरू दिली नाही.
या मोहिमेत अग्निशमन दलाचे अधिकारी भारत बारी, अश्वदीप घरडे, वाहनचालक देविदास सुरवाडे तसेच अक्षय नाईक, भगवान पाटील, यश मनोरे आणि तेजस जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या जलद प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, महापौर दीपमाला काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
प्राथमिक माहितीनुसार, वाढत्या उष्णतेमुळे शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत स्टोअर रूममधील काही साहित्याचे नुकसान झाले असून पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
