भालगाव फाट्याजवळ एसटी बसचा भीषण अपघात,१८ प्रवासी जखमी ; चालकाची प्रकृती गंभीर

एरंडोलजवळ भालगाव फाट्यावर डिव्हायडरवर आदळलेली एसटी बस; अपघातात १८ प्रवासी जखमी.

भालगाव फाट्याजवळ नियंत्रण सुटल्याने एसटी बसचा अपघात; स्थानिकांकडून मदतकार्य, रस्ते सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह.

एरंडोलपासून काही अंतरावरील भालगाव फाटा परिसरात आज सकाळी धुळेहून भुसावळकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील बसवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या डिव्हायडरवर जोरात आदळली. या अपघातात एकूण १८ जण जखमी झाले असून काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातग्रस्त बस क्रमांक एमएच २० बीएल ३४१२ मध्ये १५ प्रवासी, १ चालक, १ वाहक तसेच राज्य परिवहन महामंडळाचा १ कर्मचारी प्रवास करत होता. धडक इतकी जोरदार होती की बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेत बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, भालगाव फाटा परिसरातील सुरू असलेले रस्त्याचे काम, डिव्हायडरची रचना तसेच एसटी चालकांवरील वाढता कामाचा ताण या बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

✍️ गुरू शिंदे -8983956862

journalistgurubaba@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!