कुसुंब्यात वीज दुरुस्ती करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; महावितरणच्या कथित हलगर्जीपणाचा नातेवाइकांचा आरोप; चौकशीचे आश्वासन

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे वीज दुरुस्तीचे काम करताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागून महेश देविदास अपार यांचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी महावितरणकडून चौकशीचे आश्वासन देण्यात आले असून, नातेवाइकांनी हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.

महेश अपार यांच्या मृत्यू प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे महावितरणचे आश्वासन. दोष आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्याची माहिती.

 जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे वीज दुरुस्तीचे काम करत असताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागून ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. महेश देविदास अपार (रा. इंदिरानगर, कुसुंबा) असे मृत तरुणाचे नाव आहे. महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश अपार हे वीज दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक त्यांना विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. यामुळे ते खांबावरून खाली पडून गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

वीजपुरवठा बंद करण्याची परवानगी घेतल्यानंतरही प्रवाह सुरू कसा?

दरम्यान, महावितरणकडून वीजपुरवठा बंद करण्याची परवानगी घेतल्यानंतरही दुरुस्तीचे काम सुरू असताना विद्युत प्रवाह सुरू कसा झाला, असा सवाल महेश यांच्या नातेवाइकांनी उपस्थित केला आहे. या घटनेला जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, तसेच महेश यांच्या कुटुंबाला नुकसानभरपाई आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांचे भाऊ गजानन अपार यांनी केली आहे.

महावितरणकडून चौकशीचे आश्वासन

या आरोपांबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्ही. एस. कापुरे यांनी नातेवाइकांच्या तक्रारी तसेच घटनेशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल. तसेच नियमानुसार महेश यांच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

महेश अपार यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुसुंबा गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!