मुक्ताईनगरजवळ ट्रकला अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली. ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
मुक्ताईनगरहून मलकापूरकडे जात असलेल्या ट्रकला भीषण आग लागून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. २१ मे २०२६) रात्री पिंप्री अकराऊत गावाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक जीजे २५ डब्ल्यू ४२२६ हा पशुखाद्य घेऊन मुक्ताईनगरहून मलकापूरच्या दिशेने जात होता. दरम्यान पिंप्री अकराऊत गावाजवळ ट्रकचा अपघात झाला आणि त्यानंतर वाहनाने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले.
अपघातानंतर ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र ट्रकमधील दुसऱ्या व्यक्तीला बाहेर पडता न आल्याने तो आगीत अडकून होरपळून मृत्यूमुखी पडला. चालक जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला होता.
ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोलीस व फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
