खडका चौक परिसरातील कॉलनींमध्ये अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त; कचरा, नाली व रस्त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

भुसावळ: शहरातील खडका चौक परिसरातील गॅलेक्सी हॉटेलच्या मागील भागात असलेल्या आयान कॉलनी, जिया कॉलनी, अली रजा कॉलनी, फातिमा कॉलनी आणि हलीमा मस्जिद कॉलनी या भागांमध्ये कचरा, नाली व रस्त्यांच्या समस्यांमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. अनेक वेळा भुसावळ नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदने दिली असूनही या मूलभूत समस्यांवर अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

परिसरात घरगुती कचरा, प्लास्टिक, अन्नाचे उरलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात साचत असल्याने दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेची फिरती कचरा गाडी नियमित न येत असल्यामुळे नागरिकांना खुल्या जागेत कचरा टाकावा लागत आहे. परिणामी परिसर दिवसेंदिवस अधिक दूषित होत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साचलेल्या कचऱ्यामुळे माशा, डास व कीटकांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, कॉलरा, अतिसार आणि त्वचारोग यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात नाल्यांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे पाणी साचण्याची समस्या आणखी तीव्र होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या परिसरात नाल्यांची सुविधा नसल्यामुळे काही नागरिकांना घरासमोर खड्डे करून सांडपाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय रस्त्यांची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांना रोजच्या ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

=रमजानमध्येही समस्या कायम:

मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असतानाही नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने तीव्र नाराजी आहे. स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी आश्वासने दिली असली तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.

=शाळकरी मुलांच्या आरोग्याची चिंता:

परिसरातील एमआय तेली इंग्लिश स्कूलमुळे शहरासह आसपासच्या गावांमधून अनेक विद्यार्थी येथे येतात. अस्वच्छतेमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

=प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे:

“स्वच्छता राखण्याची जबाबदारी आम्हीही घेऊ, पण आमच्याकडे रस्ता नाही, नाली नाही आणि कचरा उचलण्यासाठी गाडीही येत नाही. मग स्वच्छता कशी राखायची?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाने रस्ते, नाली आणि कचरा व्यवस्थापनाची कायमस्वरूपी व्यवस्था तातडीने करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *