सुकळी येथील आंबेडकर नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन; विद्यार्थ्यांचा गौरव.
सुकळी | प्रतिनिधी (दि. १४ एप्रिल २०२६):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सुकळी येथील आंबेडकर नगरमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सामान्य ज्ञान, लिंबू-चमचा, वक्तृत्व, गीत गायन, बास्केटबॉल आणि संगीत खुर्ची अशा विविध प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व बौद्धिक क्षमतेला वाव मिळाला.
सायंकाळी आयोजित मुख्य जयंती कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष आयु. एस. ए. गायकवाड यांच्या हस्ते दीप व धूप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर पोलीस पाटील आयु. संदीप इंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात उपस्थितांनी सामूहिकरित्या त्रिसरण पंचशील ग्रहण केले.
यानंतर स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. सामान्य ज्ञान स्पर्धेत राजनंदनी इंगळे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक माही सोनवणे आणि तृतीय क्रमांक शौर्य सोनवणे यांनी मिळवला. बास्केटबॉल स्पर्धेत आरुषी इंगळे हिने प्रथम क्रमांक मिळवला. लिंबू-चमचा स्पर्धेतही राजनंदनी इंगळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. गीत गायन स्पर्धेत बुद्धभूषण इंगळे याने प्रथम क्रमांक मिळवून उपस्थितांची दाद मिळवली. सर्व विजेत्यांना गायकवाड सर यांच्या हस्ते मेडल व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान बुद्धभूषण इंगळे व मिलिंद इंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्य व संघर्षमय प्रवासावर प्रकाश टाकत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक मूल्यांची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे सर यांनी केले, तर पोलीस पाटील संदीप इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी उपस्थितांना खीर वाटप करून जयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक ऐक्य, प्रेरणा आणि शैक्षणिक जाणीव वाढीस लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
✍️ बुद्धभूषण इंगळे, सुकळी (मुक्ताईनगर)- 93593 05564

सतीश वाणखेडे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या तसेच जाहिराती देण्याकरिता आपण यांना संपर्क करू शकतात.
मो. क्र. ८०८०९८०५०७
ईमेल- satish02031997@gmail.com
