जळगावमधील ५००० हॉकर्सच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मनसे आक्रमक. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाविरोधात लढा उभारण्याचा मनसेचा निर्धार; वाचा सविस्तर.
जळगाव : शहरातील हॉकर्स बांधवांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक येथे आयोजित करण्यात आलेली बैठक उत्स्फूर्त वातावरणात पार पडली.
या बैठकीत मनसे पदाधिकारी व नगरपथविक्रेता समिती सदस्यांनी एकत्र येत जळगाव शहरातील सुमारे ५००० हॉकर्स बांधवांच्या हक्कांसाठी ठोस लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीदरम्यान महापालिका अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या कथित मनमानी व दादागिरीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. हॉकर्स बांधवांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून, त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले.
या वेळी अतिक्रमण विभागाची कार्यपद्धती, फेरीवाला समितीच्या मार्गदर्शक सूचना, शहरात अधिकृत हॉकर्स झोन निश्चित करण्याची गरज तसेच हॉकर्स बांधवांना सन्मानाने वागणूक देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हॉकर्सना कायदेशीर संरक्षण मिळावे व त्यांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळावे यासाठी लवकरच ठोस कृती आराखडा महापालिकेसमोर मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच मोठा मोर्चा काढण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, नगरपथविक्रेता समिती सदस्य मोहन तिवारी, विशाल पाटील, दिनेश हिंगणे, उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा, चेतन पवार, आशुतोष जाधव, विभाग अध्यक्ष खुशाल ठाकूर, शेतकरी सेनेचे प्रदीप पाटील, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक तसेच अनेक हॉकर्स बांधव उपस्थित होते.
बैठकीतून स्पष्ट संदेश देण्यात आला की हॉकर्स बांधवांवरील अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटना रस्त्यावर उतरून लढा देईल.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
