जिल्हा परिषदेसमोर लुटमारीची घटना; चौघा अज्ञात इसमांचा तरुणावर हल्ला

जळगावातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर रात्री उशिरा तरुणाला अडवून मोबाईल लुटल्याची घटना; आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू.

मध्यवस्तीत लुटमारीने नागरिकांमध्ये भीती; जळगावात तरुणाचा मोबाईल हिसकावून आरोपी फरार.

जळगाव  शहराच्या मध्यवस्तीत पुन्हा एकदा लुटमारीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोरून दुचाकीने जात असलेल्या एका १७ वर्षीय तरुणाला चौघा अज्ञात इसमांनी अडवून त्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना १४ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तकीम शेख सईद (वय १७, रा. उस्मानिया पार्क) हा तरुण आपल्या काकांना भेटून दुचाकीने (क्र. एमएच १९ सीसी ९२६८) घरी परतत होता. जिल्हा परिषदेसमोरील पत्री हनुमान मंदिराजवळ चार अज्ञात इसम दबा धरून बसले होते. त्यांनी मुस्तकीमला इशारा करून थांबवले आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केली.

मुस्तकीमने पैसे नसल्याचे सांगितल्यावर एका इसमाने त्याची अंगझडती घेतली, मात्र त्यात काहीही सापडले नाही. यावेळी दुसऱ्या आरोपीने त्याला मारण्याच्या उद्देशाने दगड उचलला, परंतु त्याच्याच एका साथीदाराने त्याला रोखले. त्यानंतर आरोपींनी मुस्तकीमच्या शर्टच्या खिशातील सुमारे ६ हजार रुपये किमतीचा विवो (वाय ३१) कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला.

घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार दीपक शिरसाठ पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!