
पीएम उषा अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील भारतीय मानव्य प्राच्यविद्या अध्ययन केंद्र तसेच कला व मानवविद्या प्रशाळेच्या वतीने “क्रीडा सृष्टीमध्ये भारतीय सृष्टी” या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन आज दि. १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजता करण्यात आले. उद्घाटन केशव (राज) चौधरी (अखिल भारतीय महामंत्री, क्रीडा भारती, पुणे) यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा प्रशासक संभाजीनगरचे पंकज भारसाखळे तसेच संचालक प्रा. राम भावसार उपस्थित होते. या परिषदेसाठी नॉलेज पार्टनर म्हणून क्रीडा भारती जळगाव यांनी सहकार्य केले.
बीज भाषणात केशव (राज) चौधरी यांनी भारतातील पारंपरिक खेळांची समृद्ध परंपरा अधोरेखित केली. लेझीम, मल्लखांब, कबड्डी, विट्टी-दांडू यांसारख्या खेळांमधून शारीरिक व बौद्धिक विकास साधला जातो, असे त्यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत क्रीडा, संतुलित आहार, तसेच खेळातून रोजगाराच्या संधी याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सहअभ्यासक्रम व अभ्यासक्रमेत्तर उपक्रमांना दिलेल्या महत्त्वावर प्रकाश टाकला. क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्य विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असून, आधुनिक तंत्रज्ञान व मानसिक आरोग्य यालाही आज क्रीडा क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात राजेंद्र नन्नवरे यांनी भारतीय जीवनशैलीत खेळांचे स्थान अधोरेखित केले, तर क्रीडा प्रशासक पंकज भारसाखळे यांनी क्रीडेमुळे व्यक्तिमत्व आणि राष्ट्रनिर्मिती घडते, असे मत व्यक्त केले.
उद्घाटन सत्रानंतर जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी ‘क्रीडाविकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना व खेळातून रोजगाराच्या संधी’ या विषयावर व्याख्यान दिले. तसेच डॉ. दयानंद कांबळे (संभाजीनगर) यांचे ‘भारतीय पारंपरिक आहार व आधुनिक पोषणशास्त्र’ आणि अमृत बिऱ्हाडे यांचे ‘क्रीडा धोरणे व भारतीय क्रीडा सृष्टीचा विकास’ या विषयांवर मार्गदर्शन झाले.
या परिषदेत राज्यभरातील सुमारे १२० क्रीडा शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली माळी व खेमराज पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. शरद पाटील यांनी केले.
यावेळी क्रीडा भारतीचे जिल्हा मंत्री प्रशांत जगताप, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, डॉ. संजय चौधरी तसेच डॉ. सुरेश थरकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
