काळी गुढी उभारून शासना विरोधात निषेध; कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा: Protest of Farmers

मलकापूर – गुढी पाडवा निमित्त गुरुवार (दि. १९ मार्च) रोजी मलकापूर येथे काळी गुढी उभारून शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी आक्रमक भूमिका घेत शासनावर जोरदार टीका केली. “कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात शेतकरी अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. अटी-शर्तींमुळे अनेक पात्र शेतकरी वंचित राहतात. त्यामुळे २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफीची तातडीची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गुढीपाडव्याच्या दिवशी पारंपरिक गुढीऐवजी काळी गुढी उभारून संघटनेने शेतकऱ्यांच्या भावना व संताप व्यक्त केला. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली. “शेतकरी वाचवा, देश वाचवा”, “कर्जमाफी द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
संघटनेने यावेळी वाढते उत्पादन खर्च, शेतीमालाला न मिळणारा हमीभाव, वाढती वीज बिले आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या मुद्द्यांवरही लक्ष वेधले. “शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही नारखेडे यांनी दिला.
शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळू ठाकरे, तालुकाध्यक्ष गोपाल सातव यांच्यासह सुभाष खुपसे, दिलीप घाटे, गजानन वानखेडे, विनोद हांडगे, ईश्वर वानखेडे, ज्ञानदेव बगाडे, अरविंद सानिसे, दिलीप बेलोकार तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!