देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील अपूर्ण कामामुळे लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शेतकरी संघटना, ग्रामपंचायती व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली.
सटाणा–पिंपळनेर राष्ट्रीय महामार्गावरील देशीरवाडे गावाजवळ पांझरा कालव्यावरील रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून लाटीपाडा धरणाचे पाणी पांजरा कालव्यातून सोडण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार, साक्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यंदा साक्री तालुक्यातील १६ गाव काटवाण परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नसल्याने नाले, बंधारे आणि जलसाठे अद्यापही कोरडे आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाटीपाडा धरणात उपलब्ध असलेले पाणी पांझरा कालव्यातून सोडल्यास परिसरातील बंधारे, विहिरी व जलस्रोतांना मोठा दिलासा मिळेल. मात्र देशीरवाडे गावाजवळ पांझरा कालव्यावरील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पाणी सोडण्यात अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पाटबंधारे विभागाने समन्वय साधून देशीरवाडे येथील कालव्यावरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे व त्यानंतर लाटीपाडा धरणाचे पाणी तात्काळ पांझरा कालव्यातून सोडावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यामुळे दिघावे, छाईल, प्रतापपूर, नाडसे, बेहेड, गणेशपूर, विटाई, निळगव्हाण, सायने, कासारेसह संपूर्ण १६ गाव काटवाण परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, १६ गाव काटवाण परिसरातील सरपंचांनीही स्वतंत्र निवेदनाद्वारे या मागणीस जाहीर पाठिंबा देत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रश्नाला स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती आणि शेतकरी संघटनांचा व्यापक पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. युवराज काकुस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन तहसीलदार, साक्री यांना सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे किसान सेल जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे किसान सेल तालुकाध्यक्ष रवींद्र देसले, धनंजय देसले, मयुर देसले तसेच अनिल तोरवणे उपस्थित होते.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
