‘मन मे है विश्वास’… आणि स्वप्नांना मिळाली ‘विकास’ची प्रेरणा; वाघाळे अभ्यासिकेत घडला प्रेरणादायी क्षण

नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथील अभ्यासिकेला भेट देताना अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थी अक्षय गांगर्डे याचा आयपीएस अधिकारी विश्वास नागरे-पाटील यांच्याशी थेट संवाद घडवून आणत प्रेरणेचा अविस्मरणीय क्षण निर्माण केला.

‘मन मे है विश्वास’ पुस्तकामुळे घडला अविस्मरणीय प्रसंग. वाघाळे अभ्यासिकेतील विद्यार्थी अक्षय गांगर्डे याला विश्वास नागरे-पाटील यांच्याशी थेट संवादाची संधी मिळाली.

कधी कधी आयुष्यात असे काही क्षण येतात, जे केवळ आठवणी बनून राहत नाहीत, तर आयुष्यभर प्रेरणा देऊन जातात. नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या आधुनिक अभ्यासिकेत असा एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी प्रसंग घडला. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नव्या उंचीची दिशा मिळाली.

जिल्हा दौऱ्यावर आलेले अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी वाघाळे येथील अभ्यासिकेला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यासह अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. अभ्यासिकेत अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अभ्यासाविषयी, उद्दिष्टांविषयी आणि अडचणींबाबत माहिती घेत खारगे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.

याच वेळी त्यांची नजर अभ्यासात मग्न असलेल्या अक्षय गांगर्डे या विद्यार्थ्याकडे गेली. अक्षयच्या हातात आयपीएस अधिकारी विश्वास नागरे-पाटील लिखित आणि हजारो तरुणांना प्रेरणा देणारे ‘मन मे है विश्वास’ हे पुस्तक होते. पुस्तक पाहताच खारगे यांनी अक्षयशी संवाद साधला. “या पुस्तकाचे लेखक आणि तुझे प्रेरणास्थान असलेल्या विश्वास नागरे-पाटील यांच्याशी कधी बोलला आहेस का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

अक्षयने नकारार्थी उत्तर दिल्यानंतर खारगे यांनी कोणताही विलंब न करता आपल्या मोबाईलवरून थेट आयपीएस अधिकारी विश्वास नागरे-पाटील यांना संपर्क साधला. काही क्षणांतच अक्षयचा त्याच्या आदर्श व्यक्तीशी प्रत्यक्ष संवाद घडून आला. अचानक मिळालेल्या या संधीमुळे अक्षयचा आनंद गगनात मावेनासा झाला. अभ्यासिकेतील इतर विद्यार्थीदेखील हा प्रसंग पाहून भारावून गेले.

संवादादरम्यान विश्वास नागरे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, जिद्द आणि सातत्य यांचे महत्त्व सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःचेही प्रेरणास्थान उलगडताना, “माझेही रोल मॉडेल आदरणीय विकास खारगे सर आहेत,” असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा जीवनधडा मिळाला की, यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली माणसेदेखील कोणाकडून तरी प्रेरणा घेत असतात.

हा प्रसंग केवळ अक्षयसाठीच नव्हे, तर अभ्यासिकेत उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी किती संवेदनशीलतेने जोडले जाऊ शकतात, याचेही हे उत्कृष्ट उदाहरण ठरले. विद्यार्थ्यांच्या आकांक्षा, त्यांच्या संघर्षाची जाणीव आणि त्यांना योग्य दिशादर्शन देण्याची प्रशासनाची बांधिलकी या प्रसंगातून स्पष्टपणे दिसून आली.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेली वाघाळे येथील अभ्यासिका ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आशेचे केंद्र बनली आहे. आधुनिक सुविधा, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि प्रशासनाकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे अनेक युवक-युवती आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

वाघाळेच्या अभ्यासिकेत घडलेला हा प्रसंग विद्यार्थ्यांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहणार आहे. एका पुस्तकामुळे सुरू झालेला संवाद, एका अधिकाऱ्याची संवेदनशीलता आणि एका विद्यार्थ्याचे स्वप्न यांचा सुंदर संगम त्या दिवशी अनुभवायला मिळाला.

म्हणूनच त्या दिवसाची आठवण एका वाक्यात व्यक्त करता येईल—

“मन मे है विश्वास… आणि साथ में है विकास!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!