नालासोपाऱ्यात १.०२ कोटींचे एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्स जप्त; नायजेरियन नागरिक अटकेत

नालासोपारा पूर्वेतील मोरेगाव परिसरात तुळींज पोलिसांची मोठी कारवाई; २ किलो ५४ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्स जप्त करत एका नायजेरियन नागरिकाला अटक, अन्य आरोपींचा शोध सुरू.

नालासोपाऱ्यात ड्रग्सविरोधी कारवाई तीव्र; १.०२ कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्यास असलेला नायजेरियन नागरिक पोलिसांच्या ताब्यात.

नालासोपाऱ्यात अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत तुळींज पोलिसांनी मोठी कारवाई करत १ कोटी २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एमडी) जप्त केला आहे. या प्रकरणी जस्टिन उसिफो मायकल ग्रेस (वय ५३) या नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली असून, त्याच्या दोन साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळींज पोलिसांना नालासोपारा पूर्वेतील मोरेगाव तलावाजवळील जिवदानी अपार्टमेंटमधील एका सदनिकेत विदेशी नागरिकाकडून बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार २७ जुलै रोजी दुपारी पोलिसांनी सदनिकेवर छापा टाकला.

कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून ९५ ग्रॅम, ५०२ ग्रॅम आणि १ किलो ४५७ ग्रॅम असा एकूण २ किलो ५४ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे १ कोटी २ लाख ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि गुन्ह्याशी संबंधित अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या जस्टिन उसिफो याच्याकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेला वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे उघड झाले. तो बेकायदेशीरपणे भारतात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या गुन्ह्यात पुण्यात राहणारा ‘ॲलेक्स’ नावाचा नायजेरियन नागरिक तसेच संबंधित सदनिकेचा मालक यांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. आवश्यक पडताळणी न करता घर भाड्याने देणे आणि अमली पदार्थांच्या व्यापारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी घरमालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही नालासोपारा पूर्वेतील नरिया नगर परिसरातील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका परदेशी महिलेच्या ताब्यातून सुमारे ४.८३ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. अलिकडच्या काळात नालासोपारा परिसरात अशा प्रकारच्या कारवायांची संख्या वाढत असल्याने हा भाग अमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!