पावसाळ्यातील आजारांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ५.९४ लाख घरांचे सर्वेक्षण; डासांची उत्पत्तीस्थळे तपासून नागरिकांना खबरदारीचे आवाहन.
मुंबईत यंदा पावसाळ्यात हिवताप आणि एच१एन१च्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबईत ८ हजार ७२३ हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ६ हजार २७७ होती. त्याचप्रमाणे एच१एन१च्या रुग्णांची संख्या यंदा ८३ वरून ५०७ इतकी झाली आहे.
मात्र, दुसरीकडे डेंग्यू, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो तसेच कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याची नोंद आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या साथी रोग नियंत्रण कक्षाने १८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पावसाळाजन्य आजारांच्या मासिक तुलनात्मक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
डेंग्यू, चिकुनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिसमध्ये घट
अहवालानुसार, १५ सप्टेंबरपर्यंत यंदा मुंबईत डेंग्यूचे २ हजार ६५६ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या २ हजार ७२४ होती.
चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून, गेल्या वर्षीच्या ५४२ रुग्णांच्या तुलनेत यंदा ८० रुग्ण आढळले आहेत. लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण ५५८ वरून ३९०, तर गॅस्ट्रोचे रुग्ण ५ हजार ९८९ वरून ४ हजार ९९७ झाले आहेत.
कोरोना रुग्णसंख्येतही मोठी घट झाली असून, गेल्या वर्षीच्या १ हजार ११८ रुग्णांच्या तुलनेत यंदा १७८ रुग्णांची नोंद झाली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध सार्वजनिक आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. गणेश मंडळांना आयईसी भित्तिपत्रकांचे वाटप करण्यात आले असून, हिवताप आणि डेंग्यूबाबत जनजागृती करणारे जिंगल्सही प्रसारित करण्यात येत आहेत.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिका रुग्णालये आणि प्रसूतिगृहांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
५ लाख ९४ हजार घरांचे सर्वेक्षण
१ ते १५ सप्टेंबरदरम्यान महापालिकेने मुंबईतील ५ लाख ९४ हजार २६९ घरांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात २७ लाख ९३ हजार १९३ नागरिकांचा समावेश होता.
निरीक्षण विभागामार्फत ३२ हजार ११४ रक्तनमुने घेण्यात आले, तर २८ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय ९ हजार ८४२ नागरिकांना लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले.
हिवताप नियंत्रणासाठी २१ हजारांहून अधिक उत्पत्तीस्थळांची तपासणी
हिवताप नियंत्रणासाठी विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरणतलाव आदी २१ हजार ६५५ संभाव्य उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३ हजार ३६७ ठिकाणी ॲनोफिलिस डासांची उत्पत्ती आढळली.
डेंग्यू नियंत्रणासाठी पाण्याची पिंपे, जुने टायर, प्लास्टिक वस्तू, पेट्री प्लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट आदी ४ लाख ६८ हजार ९९३ संभाव्य उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११ हजार ७७६ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळून आली.
महापालिकेने छत आणि आवारातून ६६१ टायर तसेच २२ हजार ३४४ भंगार वस्तू हटवल्या. याशिवाय २० हजार ७१३ इमारतींच्या परिसरात आणि ३ लाख २१ हजार ७१६ झोपड्यांमध्ये धूम्रफवारणी करण्यात आली.
१,३९० उंदरांवर नियंत्रण
१ ते १५ ऑगस्टदरम्यान पिंजऱ्यांच्या माध्यमातून ८३० उंदीर पकडण्यात आले. तसेच मूषकनाशकाच्या वापरातून ५६० उंदरांवर नियंत्रण मिळविण्यात आले. अशा प्रकारे एकूण १ हजार ३९० उंदरांवर नियंत्रणाची कारवाई करण्यात आली.
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
मुंबईत अधूनमधून पाऊस सुरू असल्याने घरात, घराभोवती तसेच इमारतींच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
जुने टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नये. नागरिकांनी मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करावा. ताप आल्यास विलंब न करता महापालिकेच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात संपर्क साधावा, असेही महापालिकेने आवाहन केले आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
