बांभोरी पुलाजवळ नदीपात्रातून तब्बल १६ तासांनी महिलेचा मृतदेह बाहेर

बांभोरी पुलाजवळ नदीपात्रात सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर जळगाव महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल १६ तासांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

जळगाव महापालिका अग्निशमन दलाचे जवान, लाइफ गार्ड, लाइफ रिंग आणि फायर हुकच्या सहाय्याने बांभोरी नदीपात्रात शोधमोहीम राबवून महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

जळगाव : बांभोरीजवळील पुलावरून नदीपात्रात पडलेल्या ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह तब्बल १६ तासांच्या शोधमोहीमेनंतर जळगाव महापालिका अग्निशमन दलाच्या पथकाने शनिवारी सकाळी बाहेर काढला. जयश्री प्रकाश चौधरी (वय ३५, रा. बिकमचंद नगर, जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता जयश्री चौधरी या बांभोरीजवळील पुलाच्या परिसरात नदीपात्रात गेल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेतला. मात्र, अंधारामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.

शनिवारी सकाळी सुमारे सात वाजता जळगाव महापालिकेचे उपमहापौर मनोज भाऊ चौधरी यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लाइफ गार्ड, लाइफ रिंग आणि फायर हुक यांच्या सहाय्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.

नदीपात्रातील पाण्याची खोली आणि पुलाच्या पिलरजवळील प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरले. जवानांनी काळजीपूर्वक शोध घेत असताना सकाळी सुमारे ११.१० वाजता जवान रवींद्र बोरसे यांना पुलाच्या पिलरजवळ खोल पाण्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी फायर हुकच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला.

हे बचावकार्य मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत वाहनचालक देविदास सुरवाडे तसेच प्रदीप धनगर, सौरभ चिकटे, सत्तार तडवी आणि चिराग वाघ यांनी सहभाग घेतला.

मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) नेण्यात आला. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!