बदलापूर–कर्जत मार्गावर नाले बांधणीच्या खोदकामामुळे वीज खांब कोसळले; १२ तास वीज पुरवठा ठप्प

बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर नाले बांधणीच्या खोदकामादरम्यान तीन वीज खांब कोसळल्याने वांगणी, दहिवली आणि कासगाव परिसरातील वीज पुरवठा सुमारे १२ तास बंद राहिला. महावितरणाने युद्धपातळीवर दुरुस्ती करत पुरवठा पूर्ववत केला असून संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बदलापूर शहराजवळ नाले बांधणीच्या कामामुळे वीज खांब कोसळून वांगणी, दहिवली आणि कासगाव परिसर अंधारात गेला. वाहतूक कोंडी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

 बदलापूर–कर्जत राज्य मार्गावर शहराच्या वेशीवर नाले बांधणीसाठी सुरू असलेल्या कामादरम्यान कंत्राटदाराच्या बेजबाबदार खोदकामामुळे मोठी दुर्घटना घडली. या कामामुळे वीजवाहिन्यांचे तीन खांब कोसळल्याने वांगणी व आसपासच्या गावांचा वीज पुरवठा सुमारे १२ तासांसाठी ठप्प झाला.

मंगळवारी मध्यरात्री बदलापूर शहराच्या वेशीवर पोदार गृहसंकुलाजवळील नैसर्गिक प्रवाहालगतच्या छोट्या पुलाजवळ हे वीज खांब कोसळले. खांब कोसळल्याने वीजवाहिन्या रस्त्यावर आल्याने तातडीने वीज पुरवठा बंद करावा लागला. या प्रकारामुळे बदलापूर–कर्जत मार्गावरील वाहतूकही काही काळ धोकादायक ठरली.

दरम्यान, दहिवली, कासगाव आणि वांगणी परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत दुपारी सुमारे १.३० वाजता वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला.

सकाळच्या वेळी या मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढल्याने मोठ्या प्रमाणावर कोंडी निर्माण झाली. परिसरातील दोन मोठ्या खासगी शाळांमुळे विद्यार्थ्यांची वाहतूक देखील अडकून पडली. तसेच ग्रामीण भागातून बदलापूर रेल्वे स्थानक व शहरात येणाऱ्या प्रवाशांनाही मोठा फटका बसला.

अवजड व हलकी वाहने एकाच मार्गावर आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. परिणामी नागरिकांना सकाळच्या वेळेत मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

महावितरणाने या घटनेची माहिती मिळताच वीज पुरवठा खंडीत केला होता. रात्री या ठिकाणी कोणतेही काम होऊ शकले नाही. सकाळी दहा नंतर या ठिकाणी काम करण्यात आले. जेथे खांब पडले त्या ठिकाणी खांबांच्या शेजारीच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कंत्राटदाराने नाले बांधणीसाठी खद्दे खोदल्याची माहिती महावितरणाच्या कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी दिली. त्यामुळे हे खांब पडले. याबाबत माहिती मिळताच वीजपुरवठा बंद करून आम्ही दुरूस्तीचे काम सुरू केले. दुपारी दीडच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत केला, अशी माहिती काटकर यांनी दिली. हे खोदकाम करणआऱ्या कंत्राटदारावर आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचेही काटकर यांनी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!