एल.पी. ब्रिजखाली पावसाच्या पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनी जखमी. विद्युत सुरक्षेबाबत महापौरांनी संबंधित विभागांना तातडीचे निर्देश दिले.
नेरुळ परिसरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याने दोन अल्पवयीन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
एल.पी. ब्रिजखाली बिकानेर स्वीट्ससमोरील परिसरात शॉर्टसर्किट झाल्यानंतर पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शुभांगी नलवडे आणि उज्वला वाघ (दोघीही वय १५) या विद्यार्थिनी त्याच्या संपर्कात आल्या.
दोघींना तातडीने डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी वाशीतील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या दोघींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पावसामुळे नेरुळ येथील एल.पी. ब्रिजखाली पाणी साचले होते. त्याचवेळी एका विद्युत वाहिनीत शॉर्टसर्किट झाल्याने पाण्यात विद्युतप्रवाह पसरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या परिसरातून जात असताना विद्यार्थिनी करंटच्या संपर्कात आल्या आणि खाली कोसळल्या. परिसरातील नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी तातडीने त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शॉर्टसर्किट नेमके कशामुळे झाले, संबंधित वायर कोणत्या यंत्रणेच्या अखत्यारीतील होती आणि पाण्यात विद्युतप्रवाह कसा पसरला, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महापौरांची घटनास्थळी पाहणी
घटनेनंतर नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून उघड्या विद्युत वाहिन्यांमुळे अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी उघडे डीपी, उघड्या वायर आणि धोकादायक विद्युत यंत्रणांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभागांना यापूर्वीच सूचना दिल्या होत्या. या घटनेनंतर पुन्हा सर्व संबंधित प्राधिकरणांना तातडीने पाहणी आणि दुरुस्तीचे निर्देश दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
