श्रीराम टॉकीज परिसरात झालेल्या राजकीय संघर्षामुळे कल्याण पूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
कल्याण पूर्वेतील श्रीराम टॉकीज परिसरात गुरुवारी संध्याकाळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि भाजप समर्थक कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले नगरसेवक मधुर म्हात्रे आणि काही भाजप समर्थक कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर नगरसेवक मधुर म्हात्रे यांना मारहाण करण्यात आली, तर त्यांचे भाऊ निलेश म्हात्रे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात मधुर म्हात्रे किरकोळ जखमी झाले असून निलेश म्हात्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागे कल्याण पूर्वेतील नाना धर्माधिकारी उद्यान परिसरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश जयस्वाल याचा सहभाग असल्याचा आरोप नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या क्षुल्लक कारणावरून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर परिस्थिती चिघळत जाऊन हाणामारी झाली आणि त्यातून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे कल्याण पूर्व भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्याचे आणि संपूर्ण घटनेचा तपास करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
