भारतीय शेतीपुढील आव्हाने आणि उपाययोजना : शाश्वत कृषी विकासाचा मार्ग

बदलते हवामान, जलसिंचन, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि शेतकरी सक्षमीकरण या माध्यमातून भारतीय शेती अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित करणारा विशेष लेख.

भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासासाठी जलसिंचन, संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारव्यवस्था आणि शेतकरी सक्षमीकरण किती महत्त्वाचे आहे? वाचा प्रा. डॉ. पी. एस. देशमुख यांच्या अभ्यासावर आधारित विशेष संपादकीय.

भारतीय अर्थव्यवस्था कृषी प्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. भारतात 58% लोकसंख्या हि शेती व शेती संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. भारतात कालपर्यंत उदर निर्वाहाचे साधन म्हणून शेतीकडे बघितले जात होते, परंतु आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रात खूप मोठा बदल करून शेतीला विकसीत करण्याचा उद्देश आज लोक साध्य करत आहे. आधुनिक काळात शेतीला विकसीत करण्यासाठी जलसिंचन पद्धत, खतांचा वापर, सेद्रिय शेतीचा वापर, बायोगॅसचा उपयोग, संकरीत बियाणाचा वापर, विविध प्रकारचे तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायला मोठ करण्यात येत आहे. परतू काही वेळेला निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्याला निराश व्हावे लागले आहे, ज्यामध्ये बदलते हवामान, अवेळी पाऊस, महापुर, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती ह्या सर्व परिस्थितीला व आव्हानांना आज भारतात तोंड द्यावे लागत आहेत.

 शेती व्यवसाय हा जगातील अत्यंत प्राचीन व्यवसाय आहे. आजच्या काळात शेती हा व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केला जातो. जगातील दोन तृतीयांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेती व्यवसायाचे स्वतंत्र अर्थशास्त्र निर्माण होऊन एक मोठी अर्थव्यवस्था विकसीत झालेली दिसून येते. आज भारतात 58% लोकसंख्या शेती व्यवसायावर व शेती संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे, म्हणून शेती व्यवसाय हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आत्मा समजला जातो.

भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेती व्यवसाय असून लोकांच्या उपजीविकेचे साधन सुद्धा शेतीच आहे. म्हणून शेतीकडे व्यवसाय व व्यापार म्हणूनच पाहिले जाते यात काही शंका नाही. भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, गेल्या 75 वर्षात देशाची लोकसंख्या चार पटीने वाढलेली दिसून येते. आज भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या घरात आहे, अर्थात 2026 पर्यंत ती 150 कोटी सहज पार करेल.

आपल्या देशात वाढत्या लोकसंख्येला पुरवण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणात अन्न धान्याची गरज लागते आणि ती बाहेरील देशातून व आपल्या देशातून शेती व्यवसायातूनच हि गरज भागवावी लागते. देशात बऱ्याच वेळेला उपलब्ध असलेल्या अन्न धान्याच्या बाबतीत व इतर संसार्धनावर दुसऱ्या देशांवर अवलंबूनच राहावे लागते. जर आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलबून राहायचे नसेल तर शेती क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात विकसीत व परिपूर्ण व्हावे लागेल. परंतु हे सहज शक्य होणारे नाही.

शेती व्यवसाय करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे बदलते हवामान, अवेळी पाऊस, महापुर, अतिउष्णता व अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती ई. देशाच्या आर्थिक विकासात शेतीचे अनन्यसाधारण महत्व आहे. अन्न धान्याच्या बाबतीत, रोजगार वाढीसाठी, औद्योगिक विकासासाठी, बाजार पेठा आणि व्यापार, देशांतर्गत व देशाबाहेरील विस्तारासाठी, परकीय चलन प्राप्त करून घेण्यासाठी, राहणीमाणात सुधारणा व वाहतूक व्यवसायांचा विकास ह्या सर्व गोष्टी देशात काही प्रमाणात काही राज्यात शेतीचा विकास झाल्यामुळे हळू हळू दिसत आहे. भारतात शेती हि पुर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेली शेती आहे. अनुकूल परिस्थितिची वाट पहावी लागते तर प्रतिकूल परिठीतीत संघर्ष करावा लागतो. म्हणून शेतीकऱ्याला बऱ्याच वेळेला हवालदिल व्हावे लागते.

भारतीय शेतीपुढील आव्हाने :-

  1. बदलते हवामान व निसर्ग – देशात बहुतांश जमीन हि निसर्गावर अर्थात पावसावर अवलंबून आहे, पण कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, अवेळी पाऊस ह्या सर्व परिस्थितीमुळे शेतीचे खूप मोठे नुकसान होत असते, याचा सरळ सरळ संबंध जागतिक तापमान वाढीशी जोडला गेलेला आहे, परंतु या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढणे हि खूप मोठी कसरत करावी लागेल.
  2. संकरीत बी-बियाणांचा व तंत्रज्ञानाचा अभाव भारतीय शेतीकरी अजूनही काही भागात पैशांच्या अभावी पारंपरिक पद्धतीने शेती करताना दिसून येतो, त्यामुळे शेती उत्पादन व त्याची उत्पादकता कमी येऊन उत्पन्न कमी मिळते, याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो.
  3. भांडवलाचा अभाव – भारतीय शेतकरी गरीब असल्याने तो आधुनिक पद्धतीने शेती करू शकत नाही, शेतीसाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसल्यामुळे तो अजून सुद्धा सावकारी व खाजगी बँकावर अवलंबून राहत आहे, यामुळे कर्जबाजारीपणा वाढतो. परंतु दिलेल्या वेळेत पैसे न दिल्यामुळे नैराश्य येऊन शेतीकरी आत्महत्येसारखं कठोर पाऊल उचलताना दिसत आहे.
  4. शेतमालास भाव नसणे – शेतकऱ्यास त्याच्या शेतमालाला वाजवी भाव मिळत नाही, अनेकदा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. जो पर्यंत शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित किंवा हवा तसा हमी भाव मिळत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणत्याच सुधारणा होणार नाही.
  5. आवश्यक सेवांसुविधांचा अभाव शेती व्यवसाय व त्यातील उत्पादन वाढवण्यासाठी भांडवल, तांत्रिक सल्ला किंवा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, विक्री व्यवस्था, साठवण गृहाची व्यवस्था, विमाचे सुरखा कवच ई सेवांची आवश्यकता असते परंतु ह्या सर्व सेवांचा खूप अभाव आपल्या देशात दिसून येतात त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत कुठलीच माहिती पोहचली जात नाही.

भारतीय शेतीपुढील आव्हानांवर सुचवण्यात आलेल्या उपाययोजना –

1) शेतीविषयक संशोधन करणे शेतीच्या संदर्भात भारतात पाहिजे तसे संशोधन होत नाही, संशोधनाचा वेग वाढण्यासाठी जोरात प्रयत्न झाले पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात एक कृषि संशोधन केंद्राची उभारणी करावी, तेव्हा कुठे चांगला परिणाम शेती व्यवसायात दिसून येईल.

2) जिल्ह्याची/विभागाची पुनर्रचना कोरडवाहु व अर्ध जिरायती शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची जास्त आवशक्यता असते. काही जिल्ह्यांमध्ये पाट, कालवे किंवा नाले यांची सुविधा असते तर काही तालुक्यांमध्ये हि सुविधा नसते त्यामुळे काही शेतकऱ्यांना पावसावरच वाट पाहावी लागते. हि परिस्थिती दुष्काळात तीव्र जाणवते म्हणून शासनाने ह्या सर्व सुविधा राबवण्यासाठी वेगवेगळे तालुके मिळून एक जिल्हा किंवा एक विभाग तयार करावा, नियोजन करावे आणि शेतजमिनीला दुष्काळ पासून मुक्त करावे.

3) जलसिंचनाचा उपयोग भारतात 62% जमीन कोरडवाहु आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून, जलसिंचनाच्या पद्धतीचा वापर करून असलेली कोरडवाहु जमीन ओलिताखाली आणता येऊ शकते. जलसिंचनाचा वापर जर प्रत्येक शेतकऱ्याने केला तर शेतीची उत्पादकता व पिकांचे उत्पादन वाढू शकते, यामुळे खूप मोठा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो व देशाचे राष्ट्रीय उत्पन्न दर वाढू शकते.

4) सेंद्रिय शेतीचा वापर – आंतरराष्ट्रीय स्तरावर कीटकनाशके व रासायनिक खते फवारलेले पिके स्वीकारले जात नाही कारण ते मानवाच्या आरोग्याला हानिकारक असतात. याचा फटका भारताला गेल्या 5 वर्षात बसलेला आहे, म्हणून भारतात जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीचे प्रबोधन करून त्याचा वापर आणि नियोजन करण्यात यावे त्याचा विकास करावा, या दृष्टीने जर प्रयत्न झाले तर नक्कीच याचा फायदा आपल्या अर्थव्यवेस्थेवर होईल व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शेती उत्पादंनांची मागणी वाढेल.

5) शेती साक्षरता अभियान भारतीय शेतकऱ्यांमधील शेतीमधील अज्ञानाचे प्रमाण कमी करण्यासाठी कृषी शाळा आणि मार्गदर्शन केंद्रांची स्थापना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करावी व एक मोठे शेती साक्षरता अभियान आणि जनजागृती आपल्या देशात चालवले गेली पाहिजे, असे जर झाले तर प्रत्येक शेतकरी शेती व्यवसायात साक्षर होऊन प्रगति करू शकतो.

6) इंटरनेटचा प्रसार – भारतातील प्रत्येक शेतकरी हा इंटरनेट व मोबाईल वापराबाबतीत साक्षर झाला पाहिजे त्यामुळे त्यांना बाजारभाव, वाहतूक व्यवस्था, व्यापार केंद्र, हमी भाव ई. माहिती त्याला मिळेल व तो अचूक ठिकाणी शेतमाल पोहचू शकतो. त्यासाठी जर इंटरनेटचा वापर व काही उपयोजन वापरसंबंधी चांगला प्रयत्न झाला तर नक्कीच त्याचा फायदा सर्वांना होऊ शकतो हे नक्की.

भारतीय शेतीपुढील सर्व आव्हानांचा व त्यावर सुचवलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून त्या सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे शेतकरी केंद्रबिंदू ठेवून त्याचा सर्व विचार करून शेती व्यवसायातील समस्यांचे प्रश्न सोडवले जाऊ शकतील. शेती व्यवसाय हा खूप मोठा व्यापार होऊ शकतो फक्त त्याचे नियोजन करणे शक्य झाले पाहिजे. भारतात आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतीतील अन्नधान्याला अनन्य साधारण महत्व आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पिके व उत्पादन, भाजीपाला व फळे यांना विशेष मागणी असते, काही विदेशात फक्त भारतीय धान्य पाहिजे असतात, यासाठी जर चांगला प्रयत्न झाला तर नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जाऊ शकतील. भविष्यात याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!