देवानांप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोका (असोका)
जगातील मोठमोठ्या पदव्या धारण करणाऱ्या शेकडो शासकामध्ये सम्राट अशोकाचे (असोका) नाव तेजस्वी सूर्यासारखे चमकत आहे. आजही त्यांचे नाव व्होल्गापासून जपान पर्यंत सन्मानाने घेतले जाते. चक्रवर्ती सम्राट अशोक (असोका) केवळ भारतीय राजांमध्ये उच्च नव्हता तर विश्व इतिहासात एक महान व्यक्ती होता. असे प्रसिद्ध इंग्रजी इतिहासकार एच. जी. वेल्स आपल्या ‘जागतीक इतिहासाची रूपरेखा’ या इंग्रजी पुस्तकात लिहितो. सम्राट अशोक एक सर्वात मोठा बौद्ध राजा हा ग्रीक आणि इथल्या इतिहासकारांकडून कमालीचा दुर्लक्षिला गेला हे प्रसिद्ध लेखक टी. डब्लू. ऱ्हीस डेव्हीस याने लिहून ठेवले आहे.
ग्रीकांनी कधीही त्यांचा उल्लेखच केला नाही. ब्राह्मणांनी त्यांना पूर्णपणे दुर्लक्षून १० ते १२ शतकापर्यंत त्यांचा गौरवशाली इतिहासच उपलब्ध होऊ दिला नाही. त्यांच्या प्रभावाचे आणि कर्तुत्वाचे ठसे पूर्णपणे पुसून टाकल्यानंतर आणि त्यांचा इतिहास अज्ञात झाला याची खात्री झाल्यानंतर मग इतर राजांच्या नामावलीत एक सामान्य राजा म्हणून समाविष्ट केले गेले. बौद्ध इतिहास हाती लागू दिला नाही. ब्राह्मण विचार सरणीने अशोकाचा (असोका) एकही शब्द व कार्य यांचा थांगपत्ता लागू दिला नाही. परंतु सम्राट अशोकाने केलेले कार्य व प्रस्थापित केलेली विचारधारा व त्यासाठी अनुसरलेली पद्धती ब्राह्मणांच्या आवाक्याबाहेरची ठरली. सम्राट अशोकाने (असोका) सर्व लोकांना नीतिमान आणि बुद्धिवादी बनविण्याचे काम केले. सम्राट अशोकाच्या (असोका) अनेक महत्वाच्या कार्यांमध्ये त्यांनी दगडावर कोरलेले लेख यांना विशेष महत्वाचे स्थान आहे. या लेखांमुळे आपणाला भारतीय इतिहासाचे यथार्थ ज्ञान प्राप्त होते. या शिलालेखातून या काळची लोकभाषा, लिपी, समाजस्थिती, सभ्यता, आर्थिक व्यवहार आणि धम्म यासंबंधी सत्य माहिती मिळते.
आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकाचा आदर्श आपणा समोर ठेवून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. राज्य घटनेनुसार देशाच्या राष्ट्र ध्वजावर अशोक चक्राचा देशाने स्वीकार केला आहे व देशाची राजमुद्रा म्हणून सारनाथ येथील स्तंभावरील चार सिंहाच्या प्रतिकृतीचा राजचिन्ह सन्मान पूर्वक स्वीकार करण्यात आला. तसेच राष्ट्रपती भवनात ‘धम्मचक्र प्रवर्तनाय’ या सम्राट अशोकाचा दिव्य संदेशाला सन्मानीय स्थान दिले. पाली भाषेला राष्ट्रीय भाषेत स्थान दिले. मगध साम्राज्यामध्ये विशेषकरून सम्राट अशोकाच्या कालखंडात जी राज्यव्यवस्था होती ती राज्य व्यवस्था समाविष्ठ करण्याचा प्रयत्न केला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमी दिनी ऐतिहासिक ‘धम्मचक्र प्रवर्तन’ करून बौध्द धम्माचे पुनरुत्थान केले. व भारतातील नागवंशियांच्या गौरवशाली वारश्यासोबत भूमिपुत्रांना जोडण्याचे कार्य केले.
अशोका (असोका) जयंतीनिमित्त आपल्या महान समृद्ध वारशा विषयी संक्षिप्त स्वरुपात माहितीसाठी हा लेख प्रपंच :
🌸 सम्राट अशोकाची (असोका) वैभवशाली परंपरा :
भारताच्या राजकीय इतिहासात मगध साम्राज्याचे निर्माण होणे ही बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतिहासाचा ‘पहिला मैलाचा दगड’ (first Landmark) मानतात. या मगध साम्राज्याची स्थापना सिसुनाग (सिसुनाक) यांनी इ. स. पूर्व ६४२ मध्ये करून नागवंशीय साम्राज्याचा पाया घातला. सिसुनाक राजवंशाची इ. स. पूर्व ४१३ पर्यंत म्हणजे २२९ वर्षे मगध साम्राज्यावर सत्ता होती. एका शक्तिशाली नंदाकडून महानंदाची हत्या झाल्याने इ. स. पूर्व ३२२ पर्यंत नंदवंश देखील मगध साम्राज्याचा शासक राहिला. तो देखील ब्राह्मण धर्मानुसार शूद्रच होता. मात्र शेवटचा नंद राजवंशाचा राजा मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्याद्वारे राजसत्तेत गेला होता. चंद्रगुप्त मौर्य हा नागवंशीय सिसुनाकाचा वंशज होता. म्हणून चंद्रगुप्ताच्या क्रांतीने मगधचे नाग साम्राज्य भरभराटीस आले या महान नागवंशात सम्राट अशोकचा इ. स. पूर्व ३०४ ला जन्म झाला. मौर्य साम्राज्याचा विस्तार सम्राट अशोकाने आपल्या कर्तुत्वावर एवढा अफाट केला की मौर्य साम्राज्य हे “अशोकाचे साम्राज्य” म्हणून ओळखले जाऊ लागले अशोक आपल्या सर्व भावंडामध्ये कुशाग्र बुद्धीचा होता. त्याने अल्पकाळात सर्व शास्त्रे व शस्त्रे यांचे ज्ञान आत्मसात केले. अशोक हा अत्यंत शूर व बलाढ्य राज्यकर्ता होता म्हणून बिंबीसार मौर्याने त्यांची नेमणूक उज्जैन (पूर्वीचे अवंती) येथे उपराज म्हणून केली.
विदिशा नगरी (सध्या मध्य रेल्वेचे भोपाळ जवळचे स्टेशन) येथील गावातील प्रख्यात श्रेष्ठींच्या ‘महादेवी’ या कन्येसोबत सम्राट अशोक इ. स. पूर्व २८६ मध्ये विवाहबध्द झाला. एक वर्षानंतर त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला. त्याचे नाव महेंद्र असे ठेवण्यात आले. हाच मुलगा पुढे ‘महिंद्र महास्थवीर’ या नावाने प्रसिद्ध झाला. आजही महेंद्रचा श्रीलंका आगमनाचा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. श्रीलंकेचे लोक देशात बुद्ध धम्माचे आगमन महेंद्राकरवी सांची या बौद्ध स्थळावरून झाले असे समजतात आणि महेंद्राला ‘द्वितीय बुद्ध’ समजून त्याचे स्मरण करतात.
महिंद्राच्या जन्मानंतर दोन वर्षांनी इ. स. पूर्व २८२ मध्ये अशोक व महादेवी यांनी एका कन्येला जन्म दिला तिचे नाव संघमित्रा होते. महेंद्रानंतर संघमित्रा ही श्रीलंकेतील राज परिवारातील राजकुमारी ‘अनुला’ व इतर राजकुलीन महिलांना दीक्षित करण्यासाठी इ. स. पूर्व २५२ मध्ये श्रीलंकेला गेली. तिने जातांना बुद्धगया येथील प्रसिद्ध बोधी वृक्षाची एक शाखा (फांदी) सोबत घेऊन गेली. ती फांदी तिने अनुराधापूरम या नगरात लावली तिचा झालेला विशाल वृक्ष आजही तेथे विद्यमान आहे. सध्याच्या बोधगया येथील बोधिवृक्ष देखील मोगल आक्रमणात नष्ट करण्यात आला होता. सुमारे चारशे वर्षापूर्वी संघामित्राने श्रीलंकेत नेलेल्या वृक्षापासून फांदी आणून सध्याच्या बोधीवृक्षाचे निर्माण करण्यात आले आहे. म्हणजेच या ऐतिहासिक बोधीवृक्षाचे जतन करण्याचे श्रेय देखील या गौरवशाली सम्राट अशोकाच्या कन्येकडे जाते.
🌸 चक्रवर्ती अशोकास राज्यप्राप्ती :
जग द्विख्यात नागवंशीय चंद्रगुप्ताचा नातू व बिन्दुसाराचा मुलगा अशोक हा तरुण वयात मोठा धाडसी व संकटास न डगमगणारा होता. त्यामुळे राज्यातील कोठलेही बंड मोडण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविली जाई. तक्षशीला येथील बंड रक्तपात न करता मोठ्या युक्तीने त्याने मोडले. म्हणून बिंबीसार मौर्याने त्यांची नेमणूक अवंती (उजैनी)चा ‘उपराज’ (सुभेदार) म्हणून केली. पुढे उजैन आणि तक्षशीला येथे मिळालेल्या प्रचंड यशामुळे राज्यातील सर्व अधिकारी व जनता आनंदित झाली होती. त्यांना अशोकाच्या सामर्थ्यावर आणि शक्तीवर पूर्ण विश्वास होता. बिंदुसार आजारी असल्याचे कळल्यावर अशोकाला उज्जैन वरून पाटलीपुत्रास ताबडतोब येण्याचा संदेश पाठविला. अशोकाला हा संदेश मिळताच तो विनाविलंब राजधानी पाटलीपुत्र येथे येऊन दाखल झाला. त्यावेळी राजमहालात सगळीकडे सुन्न व शोकाकुल वातावरण होते. त्याची व पित्याची गाठ पडली नाही. अशा काळात कुमार अशोक इ. स. पूर्व २७३ संपूर्ण मौर्य साम्राज्याचा सम्राट म्हणून घोषित झाला.
🌸 सम्राट अशोकाचा साम्राज्य विस्तार :
चक्रवर्ती सम्राट अशोकचे साम्राज्य अति प्राचीन काळापासून तर आजपर्यंत एकमेव ठरते कारण भारतातील एवढ्या विशाल प्रदेशावर आपले एकछत्री साम्राज्य कोणीच प्रस्थापित करू शकला नाही. पाटलीपुत्र (आताचे पाटणा शहर) हि मगध साम्राज्याची राजधानी होती. वायव्य प्रांत मध्य, प्रांत (माळवा) दक्षिणी प्रांत, कलिंग प्रांत अशी प्रांतवार रचना सम्राट अशोकाने राज्यकारभाराच्या सोयीसाठी केली होती. वायव्य प्रांताची राजधानी तक्षशीला, मध्य प्रांताची राजधानी अवंती, दक्षिणी प्रांतांची राजधानी सुवर्णागिरी, कलिंग प्रांताची राजधानी तोसाली येथून त्या-त्या प्रांताचा कारभार चालत असे. उत्तर-पश्चिम दिशेला हिंदुकुश पर्वतापर्यंत त्याचा राज्यविस्तार होता. कंदहार, काबुल, हिरात व बलुचीस्थान इ. प्रदेश देखील अशोकाच्याच त्याब्यात होते. सिंधू नदीच्या पलीकडील ग्रीक प्रदेश, दक्षिण अफगाणिस्थानातही अशोकाची राजसत्ता होती. काश्मीर मधील श्रीनगर अशोकाने वसविलेले शहर आहे. दक्षिण पश्चिम भारतात सौराष्ट्र, गुजरात, हिमालय पर्वत व नेपाळची भूमी त्यांच्या ताब्यात होती.
सम्राट अशोकाने नेपाळमध्ये ‘ललितपुर’ नावाचे शहर वसविले हे आज सुद्धा कायम आहे. त्या ठिकाणी अशीकाने बांधलेले स्तूप व विहार आजही अस्तित्वात आहेत. उत्तर पूर्व भारताचा संपूर्ण बंगाल प्रदेश (आजच्या बांगलादेशासह) मगध साम्राज्या मध्ये सामील होता.
🌸 सम्राट अशोकाची राज्यव्यवस्था :
पाटलीपुत्र या राजधानी वरून एवढ्या विशाल साम्राज्याच्या कारभाराचे संचलन करणे सामान्य काम नव्हते. उत्तरापथ, पश्चिमचक्र, दक्षिणपथ, कलिंग, मध्यप्रदेश यांच्या तक्षशिला, उज्जैन, सुवर्णगिरी, तोसली पाटलीपुत्र येथून राजपरिवारातील ‘उपराज’ मार्फत राज्य-व्यवस्था केली जात असे. बिंबीसाराच्या शासन काळात स्वतः कुमार अशोक उज्जैन येथील आणि अशोकचा पुत्र कुणाल राजा बनण्यापूर्वी तक्षशिला येथे ‘उपराज’ म्हणून राहिलेले आहे. ज्याप्रमाणे भारतात केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्यातील अनेक जिल्हे, तालुके आणि गट, गण असतात. त्याप्रमाणे अशोकाच्या साम्राज्यामध्ये पाटलीपुत्र येथे केंद्र सरकार होते. त्यानंतर राज्यसरकार त्यात प्रदेश, प्रदेशात जनपदे आणि जनपदाचे अनेक भाग पडलेले असत. त्यांना स्थानीय, द्रौणमुख, खार्वरिक, संग्रहण आणि गाव म्हटले जात असे राज्यात सर्वात लहान ग्राम अथवा गाव होते. दहा गावांचा एक संग्रहक बनत असे. ग्रामिक-गोप-स्थानिक-समाहर्ता-महामात्र-कुमार-अमात्य व सर्वोच्च स्थानी मौर्य सम्राट अशा प्रकारची शासनव्यवस्था सम्राट अशोकाच्या राज्य व्यवस्थेत होती. अशाच प्रकारची व्यवस्था आपण आज स्विकारली आहे असे म्हटले तरी अतिशयोक्तीचे ठरू नये.
🌸 सम्राट अशोकाची प्रजाहिताची कामे :
सम्राट अशोक प्रजाहितासाठी नेहमी झटे. त्यांनी प्रजेच्या सुखाकरिता अनेक कामे केली. प्रवाशांच्या सोयीकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडे लाविली. ठिकठिकाणी विहिरी व धर्मशाळा बांधल्या प्रजेचे दु:ख नाहीसे व्हावे म्हणून त्याने ठिकठिकाणी दवाखाने उघडले. औषधांचा पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून त्याने दिव्य औषधांच्या बागाही ठिकठिकाणी लावल्या. काठेवाडीतील सुदर्शन तलावासारखी त्यांनी धरणे बांधली.
सर्वात महत्वाचे एका माणसाचे दुसऱ्या माणसाच्या प्रती कोणती कर्तव्ये असायला पाहिजे हे शिलालेख व स्तंभालेख कोरून प्रजेच्या मनावर बिंबवले. उदा. वडिलांची मुलांबद्दल असणारी कर्तव्ये अथवा मुलांची वडिलाप्रती कशी वागणूक असावी तसेच पती-पत्नी यांनी एकमेकांच्या प्रती कसा व्यवहार करावा याचाही उल्लेख आहे. सर्व प्रजाजनांना सद् धम्माचे ज्ञान झाल्याने जनतेचा कायमस्वरूपी उद्धार झाला.
🌸 सम्राट अशोकाचे केलेले धम्मपरिवर्तन :
कलिंगच्या लढाईनंतर विजयश्री मिळवून सम्राट अशोक पाटलीपुत्र येथे आला. पाटलीपुत्र शहराच्या बाहेर मैदानावर (आजचे बिहारमधील गांधी मैदान) आला. विजयादशमीचा तो दिवस होता. त्या दिवशी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर स्त्री-पुरुष आणि मुले मैदानावर जमा होत होती. मौर्य साम्राज्याचा राष्ट्रीय ध्वज उंच डौलात फडकत होता. सर्व प्रजेच्या मनामध्ये कलिंग विजयाचा जल्लोष करण्याचा हा समारंभ असावा याची अपेक्षा होती. परंतु त्या मैदानात वास्तविक चित्र वेगळेच दिसले.
पाटलीपुत्र शहराच्या मैदानावर महाथेरो मोगलीपुत्त तिस्स यांच्या समवेत सम्राट अशोक आले होते. सम्राट अशोकाने विशाल जन समुदायासमोर सर्व प्रजाजना समक्ष महाथेरो मोगलीपुत्त तिस्स यांचे कडून बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.
सम्राट अशोकाने धम्म दीक्षे नंतर उपस्थित विराट जनसमुदायाला उद्देशून भाषण केले.
बुद्ध धम्माविषयी विवेचन ऐकून विराट जनसमुदायाने अशोका प्रमाणे बुद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यावेळी संपूर्ण पाटलीपुत्र शहर बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघ सरणं गच्छामि या मंगल ध्वनींनी दुमदुमले होते. तेव्हा पासून “विजयादशमी” हा उत्सव नावारूपाला आला. धम्मविजय या नावाने तो दिवस मगध साम्राज्यात साजरा केला जात असे. हे इ. स. पूर्व २६१ मध्ये सम्राट अशोकाने केलेले बुद्धानंतरचे दुसरे धम्मचक्र प्रवर्तन होय.
अनुवादक
कौस्तुभ शिंदे
#samratashoka #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
