मलकापूर: महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘दामिनी पथक’ सक्रिय करण्याची मागणी
शहरातील जनता कॉलेज तसेच गोविंद विष्णू महाजन विद्यालय परिसरात शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत रोडछाप टवाळखोरांकडून चिडीमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने ‘दामिनी पथक’ तात्काळ सक्रिय करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने पूर्वी ‘दामिनी विशेष पथक’ स्थापन केले होते. मात्र, गेल्या काही काळापासून हे पथक प्रभावीपणे कार्यरत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शाळा व महाविद्यालय परिसरात काही टवाळखोर युवक सतत घिरट्या घालत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काही वेळा विरोध करणाऱ्या नागरिक व शिक्षकांनाही दमदाटीचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे. अनेक विद्यार्थिनी अशा घटनांना बळी पडत असल्या तरी भीतीपोटी त्या पालकांना माहिती देत नाहीत किंवा तक्रार नोंदवत नाहीत.
सध्याच्या परिस्थितीत अशा टवाळखोरांवर पोलिसांचा धाक कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने ‘दामिनी पथक’ सक्रिय करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याचबरोबर पालकांनीही आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सजग राहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
#daminipathak #malkapur #collegegirls #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
