मीरा रोडमधील स्टार मार्केटविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मीरा रोड (पूर्व) येथील कनकिया रोडवरील स्टार मार्केट या आस्थापनेत अन्नपदार्थांच्या विक्रीत गंभीर अनियमितता आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे. अस्वच्छ वातावरण, उंदरांचा वावर, बुरशी लागलेला भाजीपाला आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
फळे व भाजीपाला ठेवलेल्या क्रेटमध्ये उंदरांचा वावर असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने ७ जुलै रोजी तपासणी केली. या तपासणीत फळे-भाज्यांवर बुरशी, उंदरांनी कुरतडलेली फळे, झुरळांचा वावर तसेच स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळून आले.
तपासणीदरम्यान दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या साठवणुकीतही नियमभंग आढळला. लेबलनुसार कमी तापमानात ठेवणे आवश्यक असताना हे पदार्थ अधिक तापमानावर साठवले जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत ही गंभीर बाब असल्याने सहाय्यक आयुक्त (अन्न) धनश्री ढाणे यांनी ८ जुलै रोजी स्टार मार्केटचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला. संबंधित आस्थापनेविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती कोकण विभाग अन्न व औषध प्रशासनाने दिली.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना स्वच्छता व गुणवत्तेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
