ठाण्यातील दिवा परिसरात शेतकऱ्यांचे मॅरेथॉन नेक्सवर्ल्डविरोधात बेमुदत आंदोलन सुरू असून, थकीत मोबदला, फसवणुकीचा गुन्हा आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दिवा परिसरातील बेतवडे गावातील शेतकऱ्यांनी मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड कंपनीचे बिल्डर मनसूर रमणीक लाल शहा, सागर गाला आणि त्यांच्या भागीदारांविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. जमीन व्यवहाराचा मोबदला गेल्या दहा वर्षांपासून मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हे आंदोलन शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मॅरेथॉन नेक्सवर्ल्डच्या कार्यालयासमोर, बेतवडे येथे सुरू करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी प्रकल्पाबाबत नागरिक आणि घर खरेदीदारांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बेतवडे गावातील सुमारे ३५ ते ४० शेतकऱ्यांच्या जमिनींचे व्यवहार झाले असून, अनेकांना करारानुसार मोबदला देण्यात आलेला नाही. काही शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय बांधकाम व सदनिकांची विक्री केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडेही निवेदने दिल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये संबंधित बिल्डर व भागीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे, शेतकऱ्यांना करारानुसार थकीत मोबदला देणे, बेकायदेशीर बांधकामे थांबवणे तसेच शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय सदनिका विक्री व विकासकामांवर बंदी घालणे यांचा समावेश आहे.
न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
