बेस्ट संपानंतरही बससेवा पूर्ववत न झाल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनाने १०० कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करत १८ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय देत तात्काळ बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले असतानाही सोमवारी मुंबईतील बससेवेवर मोठा परिणाम दिसून आला. एकूण नियोजित २,७६६ बसपैकी केवळ १,८७१ बसच रस्त्यावर धावल्या, तर तब्बल ८९५ बस आगारातच उभ्या राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर सेवा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा मुंबईकरांनी व्यक्त केली होती. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुरेशा प्रमाणात बस उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
बेस्टच्या अर्थसंकल्पाचे मुंबई महानगरपालिकेत विलीनीकरण, स्वमालकीच्या पाच हजार बसचा ताफा वाढवणे, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी अदा करणे अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी कृती समितीने १८ जूनच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. तीन दिवस चाललेल्या या संपामुळे बेस्टची संपूर्ण बससेवा ठप्प झाली होती.
यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना तात्पुरती आर्थिक वाढ देण्यात आली. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना ३,००० रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना २,००० रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत कामावर रुजू होण्याचे आश्वासन दिले होते.
निर्णयानंतर सोमवारी पहाटेपासून बससेवा सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर राहिल्याने अनेक बस आगारातच थांबल्या. परिणामी मुंबईकरांना पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अडचणींना सामोरे जावे लागले.
प्रवाशांचे हाल
बससेवा कमी असल्यामुळे सकाळी रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. अनेक प्रवाशांना वेळेत कार्यालयात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मुंबई मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर गर्दीचा ताण वाढला.
या परिस्थितीचा फायदा काही शेअर टॅक्सी चालकांनी घेतला असून, निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल , चर्चगेट, दादर आणि नरिमन पॉइंट यांसारख्या प्रमुख ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली.
तसेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मेट्रो किंवा रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी लांब अंतर पायी चालावे लागले. काही ठिकाणी रिक्षा चालकांनी जास्त भाडे आकारल्याच्या तक्रारीही नोंदवल्या गेल्या.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला असला तरी बससेवेतील पूर्ण सुरळीतपणा अद्याप प्रस्थापित झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
कर्मचाऱ्यांना मेस्मा नोटिस
तीन दिवसांच्या संपकाळात बेस्ट प्रशासनाने १०० कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई केली. तसेच बस अडविणे, बसमधून प्रवाशांना खाली उतरविल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हे दाखल केले. आगारावरील गेटवर उभे राहून गेटवर इतर कर्मचाऱ्यांची अडवणूक केल्याने, बस बाहेर काढण्यास मज्जाव केल्याने ४५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
