कल्याणमध्ये खळबळ! बाथरूममधील ड्रममध्ये तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे; प्रेयसीवर संशय

कल्याणच्या मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीतील फ्लॅटमध्ये बाथरूममधील ड्रममध्ये एका तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलीस फॉरेन्सिक पुरावे, शवविच्छेदन अहवाल आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीत दुर्गंधीच्या तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या खून प्रकरणाचा मानपाडा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे.

 मुंबईलगतच्या कल्याण शहरातील मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीमध्ये अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे फ्लॅटमधील बाथरूममध्ये ठेवलेल्या ड्रममध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तरुणाची हत्या त्याच्या कथित प्रेयसीने केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून ती कोलकात्याकडे पळून गेल्याची शक्यता तपासली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित फ्लॅटमधून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत असल्याची तक्रार रहिवाशांनी मानपाडा पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटला कुलूप असल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला. बाथरूममधील ड्रममध्ये एका मोठ्या पोत्यात भरून ठेवलेले मृतदेहाचे तुकडे आढळून आले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

प्राथमिक तपासात मृत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते ड्रममध्ये लपविण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. संबंधित फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कथित प्रेयसीने फ्लॅट सोडण्यापूर्वी घरमालकाला एक व्हॉइस मेसेज पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदेशात बाथरूममध्ये मृतदेह असल्याचा आणि नळ सुरू असल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बाथरूमचा नळ सुरू ठेवण्यात आला असावा, असा तपासाचा प्राथमिक अंदाज आहे.

मृत तरुण हा संबंधित फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वावर राहत होता. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून कथित संशयित महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपास आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हत्येचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!