मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी, उर्दू, समाजशास्त्र आणि क्रीडा शिक्षकांची कंत्राटी भरती सुरू झाली आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागातील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ३० शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोमवारी पालिका मुख्यालयात थेट मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेला उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी ५८ उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ३६ शाळांमध्ये सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी सहा शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत माध्यमिक विभाग सुरू आहे. मात्र, विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि शिक्षकांची अपुरी उपलब्धता यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत होता. शासनाकडून शिक्षक उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालिकेने कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी पालिका मुख्यालयात थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपाट्टे यांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना लवकरच सेवेत रुजू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नियुक्त करण्यात येणाऱ्या शिक्षकांना दरमहा ३५ हजार रुपये मानधन देण्यात येणार असून, या भरती प्रक्रियेसाठी वार्षिक सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
गणित, विज्ञानासह विविध विषयांच्या शिक्षकांची नियुक्ती
या भरती प्रक्रियेत गणित, विज्ञान, मराठी, समाजशास्त्र, उर्दू आणि इंग्रजी या विषयांसाठी २५ शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी पाच क्रीडा शिक्षकांचीही निवड करण्यात येणार आहे.
मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन तातडीने कामावर रुजू केले जाणार असून, यामुळे माध्यमिक विभागातील शिक्षकांची कमतरता दूर होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
