शासकीय आयटीआयमध्ये निदेशक पदांसाठी भरती; ५ ऑगस्टला परीक्षा व मुलाखत

कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), जळगाव येथे विविध व्यवसायांतील तासिका तत्त्वावरील निदेशक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांसाठी ५ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे विविध ट्रेडमध्ये तासिका तत्त्वावरील निदेशक पदांची भरती जाहीर. जाणून घ्या पात्रता, परीक्षा आणि मुलाखतीची माहिती.

 कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), जळगाव येथे प्रवेश सत्र ऑगस्ट-२०२६ करिता विविध व्यवसायांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावरील निदेशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निदेशक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्जासह शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे व साक्षांकित प्रती घेऊन लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे संस्थेचे प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी कळविले आहे.

या भरती प्रक्रियेत यंत्रकारागीर-१, टीडीएम (J&F)-३, टीडीएम (D&M)-१, यंत्रकारागीर घर्षक-२, कातारी-१, ट्रॅक्टर मेकॅनिक-१, गणित चित्रकला निदेशक-७, एम्प्लॉयबिलिटी स्किल्स निदेशक-६, संधाता-१, विजतंत्री-१, फॉन्डीमॅन-१, यांत्रिक डिझेल-२, पी.पी.ओ.-१ आणि जोडारी-१ अशा विविध पदांचा समावेश आहे.

उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा उपस्थिती भत्ता देण्यात येणार नसल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे. संबंधित व्यवसायातील आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी विहित दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!