एरंडोलमध्ये सहा दिवसांनी पाणीपुरवठा, तर धरणगावच्या ११ गावांना अंजनी धरणातून आवर्तन; नागरिकांनी प्रशासनावर दुजाभावाचा आरोप केला.
अंजनी धरणातून धरणगाव तालुक्यातील ११ गावांसाठी १५ मे रोजी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर एरंडोल शहरात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला धरणगाव तालुक्यातील गावांना १५० क्युसेक्सने पाणी सोडून दिलासा दिला जात असताना, दुसऱ्या बाजूला अंजनी धरणाच्या सावलीत राहणारे एरंडोलकर मात्र सहा-सहा दिवस कोरड्या नळांकडे पाहत बसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
काही दिवसांपूर्वीच एरंडोलमध्ये पाणीटंचाईविरोधात नागरिक, संघर्ष समिती आणि वकील संघाने नगरपालिकेसमोर आंदोलन करत नियमित व वेळेवर पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. “अंजनी धरण असूनही शहर तहानलेले” अशी भावना व्यक्त करत महिलांनी, ज्येष्ठांनी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी नोंदवली होती. अनेक भागांत कमी दाबाने पाणी, तर काही ठिकाणी थेट पाणीच पोहोचत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.
अशा परिस्थितीत धरणगाव तालुक्यातील कल्याण (खु.), वाघळूद, चावलखेडा, पिंपळेसीम, भोद बु., हणमंतखेडे खु., पिंप्री खु., कल्याणेहोळ, भोद खु., हिंगोणे खु. आणि सतखेडा या ११ गावांसाठी अंजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने एरंडोलवासीयांमध्ये अन्यायाची भावना अधिक तीव्र झाली आहे.
“आमच्या शहरातच पाण्यासाठी रात्री जागून भांडी भरावी लागतात, आणि आमच्याच धरणाचे पाणी बाहेर सोडले जाते,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. उन्हाच्या झळांनी होरपळलेल्या एरंडोलमध्ये पाण्यासाठी महिलांची पायपीट, टँकरसाठी भांडणे आणि नागरिकांचे हाल सुरू असताना प्रशासनाने शहराच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या आदेशाने गिरणा पाटबंधारे विभागाने अंजनी नदीपात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र “धरण आमच्या शहरात, पण दिलासा दुसरीकडे” अशी भावना आता एरंडोलमध्ये उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे.
शहरातील नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, “एरंडोलच्या पाणीप्रश्नी तातडीने ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर पुढील आंदोलन अधिक तीव्र होईल,” असा इशारा दिला आहे.

करण शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे प्राधिनिधी असून बातम्या आणि जाहिरातींकरीता संपर्क करावा-
✍️ करण (गुरू) शिंदे -8983956862
ईमेल- journalistgurubaba@gmail.com
