जळगावमध्ये शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ५५ लाखांची फसवणूक; बनावट नियुक्ती पत्र, शासनाशी संबंध असल्याचा बनाव

बनावट नियुक्ती पत्र आणि शासनाशी संबंध असल्याचा बनाव करून जळगावमध्ये लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली.

जळगावमध्ये शासनाशी संबंध असल्याचा बनाव करून ५५ लाखांची फसवणूक; एमआयडीसी पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक.

शासनाच्या विविध विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी नेताजी चौक, मेहरूण परिसरातील कुणाल रविंद्र नाईक (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वाती जुनागडे उर्फ स्वाती इंगळे (रा. आंबेडकर चौक, शिवणी, अकोला), स्वप्नील राजेंद्र जयस्वाल आणि अमित राजेंद्र जयस्वाल यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार, २०१९ पासून आरोपींनी फिर्यादी तसेच त्यांच्या नातेवाईकांना विविध शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. या कालावधीत बनावट नियुक्ती आदेश व खोटे ओळखपत्र तयार करून देण्यात आले.

आरोपींनी शासकीय अधिकारी व विविध विभागांशी संबंध असल्याचा बनाव करून विश्वास संपादन केला आणि फिर्यादी, त्यांचा भाऊ चेतन नाईक व निखील नाईक यांच्याकडून एकूण ५५ लाख ५० हजार रुपये उकळले.

मात्र दीर्घकाळ उलटूनही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ पुढील तपास करत आहेत. आरोपी क्रमांक २ आणि ३ यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!