जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे प्रथमच पूर्णपणे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढल्याने यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. धरणातून ३,१५,२२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी परिस्थितीचा आढावा घेत नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जळगाव जिल्ह्यात संततधार पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा वाढला असून सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीवरील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजता हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून, धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार व जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत असल्याने प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. धरणातील पाण्याची आवक कायम असल्यामुळे आवश्यकतेनुसार विसर्गात बदल करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी हतनूर धरणाला प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील जलसाठा, पाण्याची आवक, विसर्ग आणि संभाव्य पूरस्थितीची माहिती घेतली. तसेच महसूल, आरोग्य, जलसंपदा, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्णपणे सज्ज राहून परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची माहिती वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तापी नदीकाठच्या गावांशी सातत्याने संपर्क ठेवणे, आवश्यक असल्यास नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराची तयारी ठेवणे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत हतनूर धरणाची जलपातळी २११.७५० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणाची पूर्ण जलाशय पातळी २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २६८.५० दशलक्ष घनमीटर (६९.२० टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा १३५.५० दशलक्ष घनमीटर (५३.१४ टक्के) इतका झाला आहे. धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडल्यामुळे ८,९२६ क्युमेक्स, म्हणजेच सुमारे ३,१५,२२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे.

मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विसर्गामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी विनाकारण नदीपात्रात, पूल किंवा बंधाऱ्यांवर जाणे टाळावे, पाण्याच्या प्रवाहाजवळ गर्दी करू नये तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांतही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. हतनूर धरणातील पाण्याची आवक आणि विसर्ग यानुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!