मालेगावातील दलित वस्ती विकास योजनेंतर्गत राबवलेल्या प्रकल्पांवर घोटाळ्याचे आरोप. तक्रारीनंतर अधिकृत चौकशी सुरू.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत दलित वस्त्यांमध्ये राबवण्यात आलेल्या सोलर वॉटर हीटर आणि ‘आरओ’ प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मालेगाव तालुक्यातील विविध दलित वस्त्यांमध्ये सन २०२१-२२ मध्ये नागरिकांना गरम पाणी आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलर वॉटर हीटर तसेच आरओ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या कामांमध्ये लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्यानंतरही अनेक ठिकाणी प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याचा, तर काही ठिकाणी प्रकल्प अस्तित्वातच नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास बच्छाव यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून, त्यांनी संपूर्ण कामांची स्थळ पाहणी, गुणवत्ता तपासणी, निविदा प्रक्रियेची पडताळणी, मोजमाप पुस्तिका, देयके व पूर्णत्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीची गंभीर दखल घेत समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवली जाणार आहे.
दरम्यान, शासनाचा निधी कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने वळवण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
