गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधाऱ्यांऐवजी पारंपरिक उच्च पातळी उच्छालक दरवाजे असलेले बंधारे उभारण्यास मान्यता; प्रकल्पाचा खर्च १,२०५.७२ कोटींवर.
जळगाव जिल्ह्यातील शेती आणि पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या ‘७ बलून बंधारे’ प्रकल्पाचे काम अद्याप सुरू न होण्यामागे केंद्र सरकारकडून निधी न मिळणे हे प्रमुख कारण असल्याची माहिती राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी लेखी उत्तराद्वारे दिली आहे.
या प्रकल्पाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्र्यांनी प्रकल्प रखडल्याची कारणे स्पष्ट केली आहेत.
मंत्र्यांच्या माहितीनुसार, या प्रकल्पाला २८ डिसेंबर २०१८ रोजी मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यामध्ये १०० टक्के खर्च केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार होता. मात्र, आतापर्यंत केंद्राकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही, अशी कबुली शासनाने दिली आहे.
दरम्यान, कालावधी लोटल्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून सध्याचा सुधारित खर्च तब्बल १,२०५.७२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या सुधारित दरसूचीवर आधारित नव्याने प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ७२ व्या बैठकीत गिरणा नदीवरील प्रस्तावित बलून बंधाऱ्यांऐवजी ‘पारंपरिक उच्च पातळी उच्छालक दरवाजे’ असलेले बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या तांत्रिक आराखड्यात बदल करण्यात आला आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
