Heavy to Very Heavy Rainfall च्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात रेड अलर्ट. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुटी जाहीर.
भारतीय हवामान विभागाने (IMD) नंदुरबार जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. मिताली सेठी यांनी शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, भारतीय हवामान विभागाने ३१ जुलै २०२६ रोजी दिलेल्या पूर्वसूचनेत नंदुरबार जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार (Heavy to Very Heavy Rainfall) पावसासह वेगवान वाऱ्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने सांगितले की, मुसळधार पावसामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील सखल क्षेत्रांमध्ये पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आदेशात नमूद करण्यात आले आहे की, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील तरतुदी तसेच भारतीय हवामान विभाग आणि राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच संबंधित यंत्रणांशी चर्चा करून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सुटी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे १ ऑगस्ट २०२६ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि सर्व महाविद्यालये बंद राहतील. जिल्हा प्रशासनाने संबंधित शैक्षणिक संस्था, पालक आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी जारी केलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
