एफडीएचा अन्नभेसळीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; ३८ लाखांचा गुटखा जप्त, पाच हॉटेलचे परवाने निलंबित ;दूषित दूध नष्ट; निकृष्ट अन्नपदार्थांवर कारवाई, नियमभंग करणाऱ्यांकडून लाखोंचा दंड वसूल

जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने अन्नभेसळ आणि नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात मोठी कारवाई करत ३८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला, ५०४ लिटर दूषित दूध नष्ट केले आणि पाच हॉटेलचे परवाने निलंबित केले.

जळगावमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक. ३८ लाखांचा गुटखा जप्त, पाच हॉटेलचे परवाने निलंबित आणि लाखोंचा दंड वसूल.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने जिल्हाभरात धडक मोहीम राबविली आहे. अस्वच्छ हॉटेल्स, प्रतिबंधित गुटखा, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि दूषित दूध विक्रीविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच हॉटेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

एफडीएने प्रतिबंधित गुटख्याविरोधात विशेष मोहीम राबवत जिल्ह्यातील २२ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत तब्बल ३८ लाख १३ हजार ४९३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणांमध्ये २८ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

 अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी
अन्नसुरक्षा मोहिमेअंतर्गत प्रिझर्व्ह फूड, तूप, बेकरी उत्पादने, सुटे खाद्यतेल, मिठाई आणि दूध यांसह विविध अन्नपदार्थांचे नमुने तपासण्यात आले. या कारवाईत १६ प्रकरणांमध्ये १६ लाख ३ हजार ९१६ रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित नमुन्यांचे प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

 ५०४ लिटर दूषित दूध नष्ट
दूध विक्रीतील गैरप्रकारांवरही एफडीएने कारवाई केली आहे. तपासणीत आढळलेले ५०४ लिटर दूषित दूध नष्ट करण्यात आले. या दुधाची किंमत सुमारे २६ हजार ४८७ रुपये होती. दूषित दूध ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट केल्याने आरोग्याचा संभाव्य धोका टळला.

नियमभंग करणाऱ्यांकडून दंड वसूल
विनापरवाना व्यवसाय, उघड्यावर अन्न विक्री आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात आली. अशा ७७ प्रकरणांमध्ये ५ लाख २४ हजार रुपयांचा तडजोड दंड वसूल करण्यात आला आहे.

 अस्वच्छ हॉटेल्सवर कारवाईचा बडगा
तपासणीदरम्यान अनेक हॉटेल्समध्ये अस्वच्छ स्वयंपाकगृहे, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. त्यामुळे पाच हॉटेल व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आवश्यक सुधारणा केल्यानंतरच संबंधितांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देणे ही प्रत्येक अन्न व्यावसायिकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे. पुढील काळातही जिल्हाभरात तपासणी मोहीम सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात परवाना निलंबन, रद्द करणे तसेच फौजदारी कारवाईसारख्या कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!