इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री प्रसारित; मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल ;सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या अहवालानंतर कारवाई; डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू

आय4सीच्या अहवालानंतर मुंब्रा पोलिसांकडून गुन्हा दाखल; डिजिटल पुराव्यांच्या आधारे संशयिताचा शोध सुरू. | www.sthaniksamachar.com

ठाण्यात इन्स्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री प्रकरणी गुन्हा दाखल. डिजिटल पुरावे, आयपी लॉग आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्याचे प्रयत्न.

 इन्स्टाग्राम या समाजमाध्यमाचा वापर करून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी एका इन्स्टाग्राम खातेधारकाविरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (आय4सी) आणि बेपत्ता व शोषित बालकांसाठीच्या राष्ट्रीय केंद्राच्या (एनसीएमईसी) अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक तपासात संबंधित इन्स्टाग्राम खात्यावरून चार वर्षांच्या कालावधीत बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह सामग्रीची देवाणघेवाण आणि साठवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र सामाजिक माध्यमांवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर, छायाचित्रे आणि व्हिडीओंवर सातत्याने नजर ठेवते. बेपत्ता व शोषित बालकांसाठीच्या राष्ट्रीय केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांच्या आधारे देशभरातील संबंधित पोलीस ठाण्यांना आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातात.

याच अनुषंगाने राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारीत एका इन्स्टाग्राम खात्यावरून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीची देवाणघेवाण होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर मुंब्रा पोलिसांच्या सायबर कक्षाने उपलब्ध कागदपत्रे आणि डिजिटल पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण केले.

या तपासात संबंधित इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून ३० एप्रिल २०२२ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत बाल लैंगिक शोषणाशी संबंधित छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसारित तसेच साठवून ठेवण्यात आल्याचे समोर आल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.

आरोपीच्या ओळखीचा शोध सुरू
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी संबंधित इन्स्टाग्राम खाते, ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांकाची माहिती पोलिसांनी ताब्यात घेतली असून, डिजिटल पुरावे, आयपी लॉग, खातेविषयक माहिती आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे संशयिताची ओळख निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!